Home Cities जळगाव जळगाव शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शोला उदंड प्रतिसाद 

जळगाव शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शोला उदंड प्रतिसाद 


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज जळगाव शहरात भव्य रोड शोचे आयोजन करण्यात आले. या रोड शोला शहरवासीयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रमुख मार्गांवर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत मुख्यमंत्री फडणवीस यांचे जोरदार स्वागत केले.

या रोड शोमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत खासदार स्मिताताई वाघ, मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार राजूमामा भोळे, आमदार अमोल जावळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जळगाव महानगरपालिका निवडणुकीतील महायुतीचे सर्व उमेदवार या रोड शोमध्ये सहभागी झाले होते.

शहरातील प्रमुख रस्त्यांवरून मार्गक्रमण करताना ठिकठिकाणी नागरिकांनी फुलांची उधळण, घोषणाबाजी आणि टाळ्यांच्या गजरात नेत्यांचे स्वागत केले. महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. “विकासाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा महायुतीला संधी द्या,” असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांशी संवाद साधताना केले.

या रोड शोमुळे जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला मोठी चालना मिळाली असून, शहरातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे. महायुतीने निर्णायक आघाडी मिळवण्यासाठी प्रचाराचा वेग वाढवला असल्याचे चित्र या रोड शोमधून स्पष्ट झाले.


Protected Content

Play sound