
खामगाव–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज वेस भागातील पुरातन व श्रद्धास्थान असलेल्या श्री खंडोबा मंदिरात येत्या शनिवार व रविवार, २० व २१ डिसेंबर २०२५ रोजी भव्य धार्मिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पारंपरिक भक्तीभाव, कीर्तन, जागरण आणि महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी हा उत्सव साजरा होणार असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शनिवार, २० डिसेंबर रोजी सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत सुप्रसिद्ध सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांच्या उपस्थितीत भव्य भजनसोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यांच्या भक्तिरसपूर्ण भजनांनी उपस्थित भाविक मंत्रमुग्ध होणार असून, त्यानंतर पारंपरिक वाघे मंडळींचा जागरण भजन कार्यक्रम होणार आहे. या जागरणात खंडोबा भक्तीचे विविध लोकपरंपरागत आविष्कार सादर केले जाणार आहेत.
रविवार, २१ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता श्री खंडोबा व लग्न सोहळा संपन्न होणार असून, त्यानंतर नंगर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ ते ९ या वेळेत श्री खंडोबा मिरवणूक काढण्यात येणार असून, मिरवणुकीनंतर महाआरतीचा कार्यक्रम होईल. ही महाआरती केशव आश्रमचे दंडेस्वामीजी महाराज यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
दुपारी १२ ते ४ या वेळेत सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, मोठ्या संख्येने भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय महोत्सवासाठी मंदिर परिसरात आवश्यक ती तयारी करण्यात आली असून, भक्तांच्या सोयीसाठी स्वयंसेवकांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
हा धार्मिक महोत्सव यशस्वी करण्यासाठी श्री शिव खंडोबा भक्त मंडळ, श्री शिव खंडोबा महिला भजनी मंडळ तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज वेस, खामगाव येथील भाविक व नागरिक प्रयत्नशील आहेत. या पवित्र उत्सवात सहभागी होऊन भक्तांनी धार्मिक आनंदाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.



