
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नवीन वीज मीटर जोडणीचे काम करून देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या महावितरण कंपनीच्या एका वरिष्ठ तंत्रज्ञानाला (वायरमन) जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. सोमवारी १५ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता हा सापळा यशस्वी झाला. लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्याप्रकरणी रात्री उशिरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव येथील गणेशवाडी परिसरात वास्तव्यास असलेल्या एका तक्रारदाराने नवीन वीज मीटर कनेक्शन मिळवण्यासाठी महावितरणचे वायरमन आत्माराम धना लोंढे (वय ५७, रा. हरीविठ्ठल नगर, जळगाव) यांची भेट घेतली होती. वायरमन लोंढे यांनी सुरुवातीला हे काम करून देण्यासाठी ४ हजार रुपयांची मागणी केली होती आणि ती रक्कम तक्रारदारांनी त्यांना दिली होती.
४ हजार रुपये देऊनही तक्रारदाराचे वीज मीटर जोडणीचे काम झालेले नव्हते. त्यामुळे त्यांनी वायरमन लोंढे यांच्याकडे कामाची विचारणा केली असता, लोंढे यांनी पुन्हा कामासाठी अडवणूक करत अतिरिक्त २ हजार रुपयांची लाच मागितली. लोंढे यांच्या सततच्या मागणीला कंटाळून तक्रारदाराने थेट जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
तक्रारीची खात्री पटल्यानंतर एसीबीच्या पथकाने सोमवारी १५ डिसेंबर रोजी दुपारी सापळा रचला. ठरलेल्या वेळेनुसार, वायरमन आत्माराम लोंढे यांनी पंच आणि एसीबीच्या अधिकाऱ्यांसमक्ष तक्रारदाराकडून २ हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्याच वेळी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले.
याप्रकरणी एसीबीच्या पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात वायरमन आत्माराम लोंढे यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर हे करीत आहेत.



