लातूर-वृत्तसेवा | माजी केंद्रीय मंत्री तथा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे आज निधन झाले असून त्यांच्या रूपाने राजकीय क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
शिवराज पाटील चाकूरकर यांनी आज पहाटे शेवटचा श्वास घेतला. ते 90 वर्षांचे होते. आपल्या सुमारे चार दशकांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी विविध महत्वाची पदे भूषविली. दिल्लीच्या राजकारणातील एक मातब्बर व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी केंद्रीय गृहमंत्रीपदासारख्या मोठ्या जबाबदारीला समर्थपणे सांभाळले होते. ते काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ नेते म्हणून ओळखले जात असत. आज उपचार सुरू असतांना त्यांनी शेवटचा श्वास घेतला. नगरपालिकेच्या राजकारणात्ूान सुरूवात करणाऱ्या शिवराज पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत मोठी मजल मारली. लोकसभा सभापती, संरक्षण मंत्री म्हणून देखील त्यांनी यशस्वीपणे कामकाज पाहिले होते.

शिवराज पाटील चाकूरकर यांनी 1973 ते 1980 या कालखंडात आमदार म्हणून काम पाहिले. यानंतर त्यांनी लातूर लोकसभा मतदारसंघातून तब्बल सात वेळेस लागोपाठ विजय मिळविला. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते राज्यसभेवर गेले. यानंतर त्यांनी चार वर्षे केंद्रीय गृहमंत्री म्हणून काम पाहिले. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आल्यामुळे त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर अलीकडच्या काही वर्षात त्ो राजकारणापासून दूर होते. गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या सूनबाई डॉ. अर्चना पाटील यांनी लातूरमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविली, मात्र यात त्यांना अपयश आले होते. शिवराज पाटील यांच्या जाण्याने राजकारणातील एक मोठे व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.



