
मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । राज्यातील लाखो लाभार्थी महिलांच्या प्रतिक्षेचा विषय ठरलेल्या “लाडकी बहीण” योजनेतील सन्मान निधी वाढीबाबत अखेर महत्त्वाचे संकेत मिळाले आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने जाहीर केलेली ही योजना अल्पावधीतच लोकप्रिय झाली असून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मोठे पाऊल मानली जाते. निवडणुकीदरम्यान सन्मान निधी 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्यात येईल, असे आश्वासन नेत्यांकडून देण्यात आले होते. मात्र सरकारला एक वर्ष पूर्ण होऊनही निर्णय न झाल्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना या योजनेबाबत स्पष्ट भूमिका मांडली. ही योजना सुरूच राहणार असून कोणालाही ती बंद करता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 2100 रुपये देण्याचे आश्वासनही योग्य वेळ आल्यावर पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. सध्या लाडकी बहिणींना दरमहा 1500 रुपये जमा केले जात आहेत; मात्र वाढीव रकमेची वाट पाहणाऱ्या महिलांसाठी ही अपडेट महत्त्वाची ठरली आहे.
दरम्यान, नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. असे झाल्यास लाभार्थी महिलांच्या खात्यात तब्बल 3000 रुपये जमा होऊ शकतात. या संदर्भात प्रशासन तयार असून लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
योजनेसाठी सरकारने केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली आहे. सुरुवातीला 18 नोव्हेंबरची अंतिम मुदत दिल्यानंतर ती वाढवून आता 31 डिसेंबर करण्यात आली आहे. जर केवायसी पूर्ण नसेल, तर संबंधित लाभार्थींचा हप्ता थांबण्याची शक्यता असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे लाभार्थींनी केवायसी प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



