Home Uncategorized दाणा बाजारासह जळगावमध्ये व्यापार बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

दाणा बाजारासह जळगावमध्ये व्यापार बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यभरातील व्यापाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे होत असलेले दुर्लक्ष आणि अन्यायकारक धोरणांच्या निषेधार्थ शुक्रवार, ५ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजेपासून एक दिवसाचा राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. या बंदला जळगाव शहरातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा देत आपला निषेध नोंदवला. या बंदमध्ये राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या जळगावच्या दाणा बाजारातील व्यापाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. येथील सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने पूर्णपणे बंद ठेवली. यामुळे संपूर्ण दाना बाजार परिसरात आज दिवसभर शुकशुकाट पाहायला मिळाला.

व्यापाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये अन्नधान्य व खाद्यान्न वस्तूंवर आधीच जीएसटी लागू असताना, त्याचसोबत आकारला जाणारा बाजार समिती कर (सेस) त्वरित रद्द करावा, तसेच ऑनलाइन परवाना पद्धतीसह इतर प्रशासकीय अडचणी त्वरित दूर कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. जळगाव शहरातील दाणा बाजार परिसरातील १७० हून अधिक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून या राज्यव्यापी आंदोलनात सहभाग नोंदविला आहे.

दाणा बाजार हा जळगाव शहराच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. येथील व्यापार ठप्प झाल्यामुळे आज कोट्यवधी रुपयांची उलाढाल थांबली आहे. या बंदामुळे केवळ जळगावच नव्हे, तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतमालाची खरेदी-विक्री थांबल्याने ग्राहक आणि शेतकरी यांच्यावरही अप्रत्यक्ष परिणाम झाला आहे. व्यापाऱ्यांनी केलेल्या या एक दिवसाच्या तीव्र आंदोलनाची सरकारने त्वरित दखल घेऊन त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound