Home Cities जळगाव ‘जोपर्यंत रस्ते होत नाहीत तोपर्यंत उपोषण थांबणार नाही’; महापालिकेसमोर आमरण उपोषण

‘जोपर्यंत रस्ते होत नाहीत तोपर्यंत उपोषण थांबणार नाही’; महापालिकेसमोर आमरण उपोषण


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पंडितराव कॉलनी आणि आशा बाबा नगर परिसरातील नागरिकांनी अंतर्गत रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे त्रस्त होऊन जळगाव महानगरपालिकेसमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण किंवा सिमेंट काँक्रिटीकरण व्हावे, या प्रमुख मागणीसाठी स्थानिक नागरीक शांताराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी हा लढा उभारला आहे.

मंगळवार, २ डिसेंबर रोजी या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. मात्र, उपोषण सुरू होऊन ४८ तास उलटले तरी जळगाव महानगरपालिका प्रशासन किंवा शासनाकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. प्रशासनाच्या या उदासीन धोरणामुळे उपोषणकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. शांताराम पाटील आणि उपोषणात सहभागी नागरिकांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “जोपर्यंत आमच्या परिसरातील रस्त्यांची कामे सुरू होत नाहीत, तोपर्यंत हे बेमुदत आमरण उपोषण सुरूच राहील,” असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे. यावेळी आमदार राजूमामा भोळे यांनी उपोषणस्थळी भेट घेवून त्यांना रस्ते करण्याबाबत आश्वासीत केले.

दुसऱ्या दिवशी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी परिसरातील नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी मनपाजवळ गर्दी केली होती. मनपा प्रशासन आता या गंभीर मागणीची दखल घेऊन उपोषणकर्त्यांशी संवाद साधते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound