
अयोध्या-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । उत्तर प्रदेशातील अयोध्येतील भव्य राममंदिराच्या शिखरावर आज (25 नोव्हेंबर) इतिहासातील आणखी एक सुवर्णक्षण अंकित झाला. प्रभू श्रीरामाच्या दिव्य उपस्थितीत मंदिराच्या कळसावर भगव्या धर्मध्वजाचे दिमाखात ध्वजारोहण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या या पूजन आणि ध्वजारोहण सोहळ्यामुळे अयोध्येच्या पवित्र भूमीवर अपार भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले. हजारो भाविकांनी उपस्थित राहून “जय श्रीराम”च्या घोषात हा ऐतिहासिक क्षण अनुभवला.

समारंभाची सुरुवात राममंदिराच्या शिखरावर फडकणाऱ्या धर्मध्वजाच्या विधीवत पूजनाने झाली. कोविदार वृक्षाचे प्रतीक आणि तेजस्वी सूर्याची प्रतिमा असलेला हा ध्वज भगव्या तेजाने उजळून निघत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक यांनी एकत्र प्रभू श्रीरामाचे पूजन पूर्ण करून ध्वजाला कळसाच्या दिशेने मार्ग दाखवला. बटन दाबताच मंत्रोच्चारांच्या निनादात धर्मध्वज केशरी तेज पसरवत आकाशाकडे झेपावला.
हवेचा जोर प्रचंड असतानाही हा भव्य धर्मध्वज 161 फूट उंचीच्या शिखरावर अचूक स्थिरावला. जमिनीपासून 191 फूट उंच असलेल्या या ध्वजाच्या स्थिरावण्याचा क्षण समोर येताच पंतप्रधान मोदी भावनांनी अक्षरशः भारावून गेले. त्यांच्या जोडलेल्या हातांतून उमटणारा भक्तिभाव पाहून उपस्थित भाविकांचेही डोळे पाणावले. राममंदिराच्या कळसावर भगवा ध्वज स्थिरावल्याचा क्षण संपूर्ण अयोध्येने एक देवक्षण म्हणून अनुभवला.
धर्मध्वजाचा अर्थ, प्रेरणा आणि संदेश सांगताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “सत्याचाच विजय होतो, असत्याचा नाही. सत्य हेच ब्रह्मस्वरूप आहे. ‘प्राण जाये पर वचन न जाये’—ही रामायणाची शिकवण हा धर्मध्वज जगाला सांगत राहील.” तसेच समाजात गरीबी, भेदभाव किंवा विवंचना नसलेले आदर्श वातावरण निर्माण करण्यासाठी हा ध्वज प्रेरणेचे प्रतीक असेल, असेही त्यांनी नमूद केले.
या ध्वजारोहण सोहळ्यासोबत राममंदिराच्या बांधकामाचा प्रवासही पुन्हा स्मरणात आला. 9 नोव्हेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाने मंदिर बांधकामाला परवानगी दिल्यापासून ते 22 जानेवारी 2024 रोजी श्रीराममूर्तीच्या प्रतिष्ठापनेपर्यंत आणि 5 जून 2025 रोजी अन्य सात देवी-देवतांच्या मूर्तींच्या प्रतिष्ठापनेपर्यंत हा प्रवास टप्प्याटप्प्याने पार पडला. आजचा ध्वजारोहण सोहळा या प्रवासाला भक्तिभावाची शिखरे गाठून देणारा ठरला.
राममंदिरावरील ध्वजाचे तांत्रिक वैशिष्ट्यही लक्षवेधी ठरले. केशरी रंगाचा हा ध्वज 11 फूट रुंद, 22 फूट लांब आणि 42 फूट उंच आहे. बटन दाबताच दोरीच्या सहाय्याने तो कळसाच्या माथ्यावर पोहोचतो. मंदिराच्या शिखराची एकूण उंची 161 फूट असून ध्वज फडकत असलेले बिंदू जमिनीपासून तब्बल 191 फूट आहे. मंदिराच्या रचनेइतकाच हा ध्वजही भव्यता आणि श्रद्धेचे प्रतीक म्हणून ओळखला जाईल.



