
मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक १५ मधून शिवसेनेच्या सविता सुभाष भलभले यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेमुळे स्थानिक स्तरावर, विशेषतः भलभले समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
शहरातील शिवसेना शहर संघटक वसंत सुभाष भलभले यांच्या मातोश्री असलेल्या सौ. सविता भलभले यांनी यापूर्वीही या प्रभागातून निवडणूक लढवली आहे. त्यामुळे त्या प्रभागातील नागरिकांमध्ये एक ओळखीचा आणि विश्वासार्ह चेहरा म्हणून परिचित आहेत. मागील कामांची शिदोरी घेऊन मतदारांसमोर गेल्या पाच वर्षांत प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी केलेल्या कामांचा उल्लेख सध्या स्थानिक पातळीवर चर्चेचा विषय ठरला आहे. यामध्ये गटारी, रस्ते, विद्युत सुविधा तसेच महिलांच्या अडचणी सोडविण्यावर त्यांनी भर दिला होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, प्रभागातील तीव्र पाणी समस्या सोडवण्यासाठी त्यांनी टँकरद्वारे घरोघरी पाणीपुरवठा केल्याची माहिती देण्यात आली. यासोबतच, त्यांनी कामगार योजनेत गरजूंना भांडी आणि पेट्या वाटप तसेच ‘लाडकी बहीण’ योजनेमध्ये महिलांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना लाभ मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.
कोरोना काळातील सेवा ठरली जमेची बाजू कोरोना महामारीच्या अत्यंत कठीण काळात जनतेसाठी केलेल्या निःस्वार्थ सेवेमुळे मुक्ताईनगर तालुक्यात त्यांची ओळख एक समाजसेविका म्हणून झाली आहे. या जनसेवेमुळे जनतेचा त्यांच्यावर चांगला विश्वास बसलेला असल्याचे कुटुंबातील सदस्यांनी सांगितले.
प्रभागातील अद्याप प्रलंबित असलेली विकासकामे आगामी काळात पूर्ण करण्याच्या मुख्य हेतूने त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, असे त्यांच्या कुटुंबीयांनी स्पष्ट केले. नागरिकांनी पूर्वी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, सौ. भलभले यांनी पुढील काळातही प्रभागाच्या विकासासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.



