Home Uncategorized पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक थांबवा : डॉ. राधेश्याम चौधरींची मागणी

पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक थांबवा : डॉ. राधेश्याम चौधरींची मागणी


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील अंजाळे सर्कलमधील बामणोद परिसरातील 15 गावांतील शेतकऱ्यांना अन्यायकारक पद्धतीने मिळणाऱ्या केळी पिक विमा नुकसानभरपाईविरोधात भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट घेतली. पीकविमा कंपनीच्या मनमानीमुळे हजारो शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने त्यांनी तत्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली.

मंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशानुसार आणि आमदार अमोल जावळे यांच्या सूचनेनुसार ही भेट घेण्यात आली. या बैठकीत डॉ. चौधरी यांनी सांगितले की, बामणोद परिसरातील पंधरा गावांतील जवळपास 975 हेक्टर जमिनीवरील केळी पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. तथापि, विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी 74,500 रुपयांच्या ऐवजी केवळ 42,500 रुपयांची भरपाई देण्यात येत आहे. हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अंजाळे सर्कलमध्ये हवामान केंद्रावर कोणतीही हवामान मापन यंत्रे नसल्याने भुसावळ तालुक्यातील साकेगाव सर्कलच्या हवामान केंद्राच्या अहवालावर भरपाई ठरविण्यात आली आहे. त्यामुळे वास्तव स्थितीचा योग्य अंदाज न घेताच नुकसानभरपाई निश्चित केली जात असल्याचा आरोप डॉ. चौधरी यांनी केला.

या प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी जिल्हा कृषी अधिकारी आणि विमा कंपनीच्या राज्यस्तरीय अधिकाऱ्यांना संपर्क साधून योग्य ती चौकशी करण्याचे आश्वासन दिले. तसेच, पुढील काळात प्रत्येक सर्कलमध्ये हवामानविषयक यंत्रे बसविण्याचे आदेश देऊन अशा प्रकारच्या चुका होऊ नयेत, अशी सूचनाही केली.

सर्वांचा अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांशी अन्याय होऊ नये, तांत्रिक कारणे दाखवून त्यांची पिळवणूक होऊ नये हीच आमची अपेक्षा असल्याचे डॉ. राधेश्याम चौधरी यांनी सांगितले.

या वेळी 15 गावांमधील सुजित चौधरी, जितेंद्र चौधरी, निलेश चौधरी, दीपक चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, गिरधर चौधरी, जगदीश पाटील, विकास पाटील, कल्पेश पाटील, धनराज कोळी, लिलाधर चौधरी, प्रशांत पाटील, दीपक पाटील यांसह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound