Home क्राईम चाळीसगाव-कन्नड मार्गावर दरोड्याची थरारक घटना! डॉक्टर कुटुंबाला लुटले !

चाळीसगाव-कन्नड मार्गावर दरोड्याची थरारक घटना! डॉक्टर कुटुंबाला लुटले !


चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव-कन्नड मार्गावरील रांजणगाव फाट्याजवळ पाचोरा येथील एका डॉक्टर कुटुंबावर दरोडेखोरांनी हल्ला करत सुमारे १ लाख २० हजार रुपयांचा ऐवज लुटल्याची धक्कादायक घटना रविवारी २७ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा घडली. महामार्गावर घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांमध्ये आणि परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पाचोरा येथील डॉ. योगेश पाटील हे आपल्या कुटुंबासह कारने पुण्याकडे प्रवास करत असताना रांजणगाव फाट्यावरील एका पेट्रोल पंपाजवळून जात असताना त्यांना गाडीच्या खाली काहीतरी वस्तू लागल्याचा आवाज आला. डॉ. पाटील यांनी तातडीने कार थांबवताच दबा धरून बसलेले सात ते आठ दरोडेखोर अचानक समोर आले.

तोंडाला रुमाल बांधलेले आणि अंगात काळे कपडे परिधान केलेल्या या दरोडेखोरांच्या हातात लाकडी काठ्या होत्या. त्यांनी कोणताही विचार न करता कुटुंबियांवर हल्ला चढवला. दरोडेखोरांनी मारहाण करून कुटुंबाजवळील सोन्याचे दागिने, आयफोनसह दोन मोबाईल आणि रोख रक्कम असा साधारण सव्वा लाख रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून घेतला आणि अंधाराचा फायदा घेऊन पोबारा केला.

या घटनेमुळे डॉक्टर कुटुंब हादरले असून, त्यांनी तात्काळ चाळीसगाव ग्रामीण पोलिसात धाव घेत घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने डॉ. योगेश पाटील यांच्या तक्रारीवरून दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. या मार्गावर दरोड्याची घटना घडल्याने महामार्गावरील रात्रीच्या प्रवासाच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिसांनी दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.


Protected Content

Play sound