

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । श्री सिद्ध पीठ अवचित हनुमान मंदिर, रिधूर येथे रविवार २६ ऑक्टोबर रोजी पांडव पंचमीच्या निमित्ताने अन्नकोट छप्पन भोगचा भव्य कार्यक्रम परंपरागत पद्धतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या धार्मिक सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील अवचित हनुमान भक्तांनी हजारोच्या संख्येने उपस्थिती लावली होती.
या अन्नकोट कार्यक्रमाची परंपरा अखिल भारतीय दिगंबर आखाडाचे महंत श्री माधवराव महाराज यांनी सुरू केली होती. त्यांच्या पश्चात, दिगंबर आखाड्याचे परंपरागत शिष्य दिपकदास महाराज हे ही परंपरा अत्यंत श्रद्धेने आणि निष्ठेने पुढे चालवत आहेत. पांडव पंचमीच्या दिवशी आयोजित करण्यात येणाऱ्या या छप्पन भोग (अन्नकोट) कार्यक्रमाला पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
यंदाही रिधूर सिद्ध पीठ येथे भक्तांची मोठी गर्दी उसळली होती. अन्नकोट आणि छप्पन भोगच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. सर्व भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या धार्मिक सोहळ्याला तुळशी गोवर्धन फाउंडेशनचे आकाश सुरेश सोनवणे तसेच संदीप सपकाळे, राहुल कोळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दिपकदास महाराज आणि उपस्थित मान्यवरांनी भाविकांना मार्गदर्शन केले.
संपूर्ण मंदिर परिसर आणि परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. दिगंबर आखाड्याच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य अन्नकोट कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. पांडव पंचमीनिमित्त आयोजित या धार्मिक सोहळ्यामुळे रिधूर येथे भक्तीमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.



