
शेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दिवाळीच्या मुख्य दिवसांपैकी एक असलेल्या लक्ष्मीपूजनाच्या पवित्र मुहूर्तावर संत नगरी शेगावमध्ये राज्यासह राज्याबाहेरील भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. ‘सेवा, स्वच्छता आणि नम्रता’ या त्रिसूत्रीमुळे संपूर्ण देशात व विदेशात नावलौकिक प्राप्त असलेल्या विदर्भाची प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या शेगावमध्ये आजचा दिवाळीचा महत्त्वाचा दिवस ‘श्रीं’च्या चरणी समर्पित करण्यासाठी भाविक नतमस्तक झाले.

श्रींच्या साक्षीने दिवाळी साजरी करण्याची ओढ
अनेकांचा नित्यक्रम म्हणून दरवर्षी लक्ष्मीपूजनाचा दिवस श्री गजानन महाराजांच्या साक्षीनेच साजरा करण्याचा भाविकांचा मानस असतो. त्यामुळे पहाटेपासूनच शेगावातील वातावरण भक्तीमय झाले होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून चिमुकल्यांसह कुटुंबप्रमुख आपल्या परिवारासह श्रींच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत.
व्यवस्थेची शिस्त चिमुकल्याकडून स्पष्ट
शेगाव संस्थानाच्या व्यवस्थापनाची शिस्त, स्वच्छता आणि नम्रता याचे उदाहरण आज स्थानिक शेगाव येथील एका चिमुकल्यानेच आपल्या बोलक्या शब्दात व्यक्त केले. या चिमुकल्याने येथील व्यवस्थापनाबद्दलची उत्सुकता व भावना व्यक्त करताना सांगितले की, हीच शिस्त आणि स्वच्छता शेगावाला देशपातळीवर घेऊन गेली आहे. यामुळे येथील व्यवस्थेची प्रचिती सर्वसामान्य भाविकांना मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भाविकांनी सांगितला अनुभव
सकाळपासूनच शेगावचा दिनक्रम कसा आहे आणि भाविक कशा प्रकारे शांत, शिस्तबद्ध वातावरणात आपली दिवाळी इथे साजरी करत आहेत, याबद्दल भाविकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एका भाविकाने सांगितले, “घरी दिवाळी साजरी करण्यापेक्षा श्रींच्या चरणी सेवा अर्पण करण्यात जो आनंद आहे, तो अवर्णनीय आहे. येथील स्वच्छता आणि सेवाभाव मनाला शांती देतो.”
आज दिवसभर दर्शनासोबतच अनेक भाविकांनी संस्थानातर्फे चालणाऱ्या विविध सेवाकार्यात सक्रिय सहभाग घेतला. या अतुलनीय व्यवस्थेमुळे शेगावमधील लक्ष्मीपूजन भाविकांसाठी केवळ एक धार्मिक विधी न राहता, एक आत्मीय व शांत दिवाळी अनुभवण्याची ओढ बनली आहे. पोलिसांनी आणि संस्थानच्या सेवकांनी भाविकांना शिस्तबद्ध दर्शन मिळावे यासाठी चोख व्यवस्था ठेवली आहे.



