वाळूने भरलेला ट्रॅक्टर पलटी; तरूणाचा दबुन दुदैवी मृत्यू !


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तापी नदीकाठावरून वाळू घेऊन गावाकडे परत येत असताना ट्रॅक्टर पलटी झाल्याने एका २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मुक्ताईनगर तालुक्यातील पिंपरीनांदू शिवारात सोमवारी २० ऑक्टोबर दुपारी १२.१५ वाजेच्या सुमारास ही अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. या अपघातामुळे पिंपरीनांदू गावावर शोककळा पसरली असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ट्रॉलीखाली दबून मृत्यू
या भीषण अपघातात तोहीत शाह इस्माईल शाह (वय २१, रा. पिंपरीनांदू) या तरुणाला आपला जीव गमवावा लागला. तो रोजंदारीवर मजुरीचे काम करत होता. मिळालेल्या माहितीनुसार, तोहीत आज सकाळी ११ वाजता नदीकाठावर वाळू भरण्यासाठी गेला होता. वाळू भरून गावाकडे परतत असताना शेतातील रस्त्यावर ट्रॅक्टर (आयशर ४८५) आणि त्यामागील ट्रॉली अचानक पलटी झाली. तोहीत ट्रॉलीखाली दबल्याने त्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

एक तरुण गंभीर जखमी
या ट्रॅक्टरमध्ये तोहीतसोबत असलेला दुसरा तरुण अनिकेत संदीप इंगळे हादेखील या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्या पायाला जबर मार लागल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

ग्रामस्थांनी धाव घेतली
अपघाताची माहिती मिळताच पिंपरीनांदू येथील ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने ट्रॅक्टर सरळ करून तोहीत यास बाहेर काढण्यात आले आणि उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.

वाहन विनाक्रमांकाचे
फिर्यादी सलीम शाह करीम शाह (वय ३९, चुलत भाऊ) यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त आयशर ४८५ ट्रॅक्टर आणि त्यामागील ट्रॉली हे दोन्ही विना क्रमांकाचे (बिननंबर) होते. अनधिकृत वाळू वाहतूक आणि विना नंबरचे वाहन यामुळे अपघाताची तीव्रता वाढल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पो.हे.का. लीलाधर भोई हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.