सावदा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाघोदा-थोरगव्हाण गटातून माजी पंचायत समिती उपसभापती मायादेवी कृष्णा बाऱ्हे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक राजकीय वर्तुळात त्यांचे नाव संभाव्य उमेदवार म्हणून पुढे येत असून, त्यांच्या उमेदवारीमुळे या गटातील निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.
उदळी (ता. रावेर) येथील रहिवासी असलेल्या मायादेवी बाऱ्हे या ग्रामीण भागातील एक अनुभवी आणि जनसंपर्कसंपन्न नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी रावेर पंचायत समितीच्या उपसभापती म्हणून कार्य करताना विकासकामांना गती दिली आणि महिला सक्षमीकरण, शिक्षण तसेच ग्रामविकासाच्या विविध उपक्रमांना चालना दिली.

त्यांच्या कार्यकाळात अनेक शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या असून, गावोगाव जनसंपर्क आणि लोकसहभागाच्या माध्यमातून प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून त्यांनी भूमिका बजावली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांचा प्रभाव मजबूत असून कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वासाचे वातावरण आहे.
स्थानिक कार्यकर्त्यांच्या मते, “मायादेवी ताई बाऱ्हे या सर्वसामान्यांच्या हितासाठी नेहमी तत्पर राहिलेल्या नेत्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली गटातील सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल,” असे मत व्यक्त केले जात आहे. आगामी काही दिवसांत त्यांच्या अधिकृत उमेदवारीची घोषणा झाल्यास वाघोदा-थोरगव्हाण गटातील निवडणूक चुरशीची होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
वाघोदा-थोरगव्हाण गटातून मायादेवी बाऱ्हे यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू होताच राजकीय वातावरण तापले आहे. अनुभवी आणि कार्यक्षम नेत्या म्हणून त्यांचे नाव पुढे येणे ही या निवडणुकीतील एक महत्त्वाची घडामोड ठरू शकते.



