Home Cities जामनेर मूल्यांची रुजवणूक ही काळाची गरज : मनोज खोडपे

मूल्यांची रुजवणूक ही काळाची गरज : मनोज खोडपे

0
149


पहूर, ता. जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आजच्या गतिमान आणि स्पर्धात्मक युगात मानवी मूल्यांची झपाट्याने घसरण होत आहे. अशा पार्श्वभूमीवर समाजात पुन्हा मूल्यांची रुजवणूक करण्याची गरज पूर्वीपेक्षा अधिक तीव्र झाली आहे, असे मत सुलभक मनोज खोडपे यांनी व्यक्त केले. ते पहूर पेठ केंद्र शाळेत आयोजित केंद्रस्तरीय मूल्यवर्धन शिक्षक प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन करत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख भानुदास तायडे होते. प्रमुख अतिथी म्हणून शांतीलाल मुथ्था फाउंडेशनचे तालुका समन्वयक लखन कुमावत तसेच ग्रेडेड मुख्याध्यापक प्रवीण पाटील उपस्थित होते.

प्रशिक्षण सत्रात मनोज खोडपे यांनी विविध कृती आणि उपक्रमांच्या माध्यमातून मूल्य संस्कार तासिका घेतली. त्यांनी शिक्षकांना विद्यार्थ्यांमध्ये नैतिकता, सहिष्णुता, आणि सहकार्य यांसारखी मूल्ये रुजविण्याचे आवाहन केले. तसेच शिक्षण हे फक्त विषयज्ञान देण्याचे माध्यम नसून, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचेही प्रभावी साधन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रशिक्षणात गोपाल सपकाळ यांनी “बहुवर्ग अध्यापन” या विषयावर मार्गदर्शन केले, तर शंकर भामेरे यांनी सांगितले की “विद्यार्थी शिक्षकांचे अनुकरण करतात आणि त्यातून नकळत मूल्यांची पेरणी होत असते.” त्यामुळे शिक्षकांनी स्वतःचे आचरण मूल्याधारित ठेवणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. गोपाल पाटील यांनी प्रशिक्षणाचा आढावा घेतला. या प्रसंगी भानुदास पाटील, गोकुळ महाजन, संतोष भडांगे, अजय देशमुख, किरण पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते.

पहूर येथे आयोजित मूल्यवर्धन शिक्षक प्रशिक्षणात मनोज खोडपे यांनी शिक्षकांना विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांची रुजवणूक करण्याचे आवाहन केले. समाजात चांगल्या मूल्यांचा पाया मजबूत करण्यासाठी शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचा संदेश या प्रशिक्षणातून देण्यात आला.


Protected Content

Play sound