उमेद अभियानाला बळ! श्रीराम पेठेत समूहांच्या शॉपिंग मॉलचे उद्घाटन !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ग्रामीण भागातील महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला अधिक बळ मिळावे, या उद्देशाने जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील श्रीराम पेठ परिसरात उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि जळगाव पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने समूहांच्या भव्य शॉपिंग मॉलचे उद्घाटन करण्यात आले.

हा महत्त्वपूर्ण उपक्रम शुक्रवार, १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता पार पडला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते फीत कापून या शॉपिंग मॉलचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन समारंभास ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी सरला पाटील, जिल्हा अभियानाचे व्यवस्थापक हरेश्वर भोई यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समितीचे पदाधिकारी, उमेद अभियानाचे अधिकारी-कर्मचारी आणि परिसरातील बचतगटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी बचतगटांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले की, “महिला बचतगट हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. उमेद अभियानाच्या माध्यमातून त्यांना हक्काची बाजारपेठ मिळाल्यास त्यांच्या उत्पादनांना योग्य भाव मिळेल आणि महिला अधिक सक्षम होतील. शासनाचा या उपक्रमाला पूर्ण पाठिंबा राहील.”

या शॉपिंग मॉलमुळे नशिराबाद परिसरातील तसेच जळगाव तालुक्यातील विविध महिला बचतगटांनी तयार केलेले हातमाग, खाद्यपदार्थ, कलाकुसरीच्या वस्तू, तसेच दैनंदिन उपयोगाच्या अनेक उत्पादनांची विक्री एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. यामुळे बचतगटांच्या उत्पादनांना चांगली मागणी मिळून त्यांच्या व्यवसायाला चालना मिळणार आहे. हा शॉपिंग मॉल ग्रामीण महिलांच्या जीवनोन्नतीच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे आणि अभिनव पाऊल मानले जात आहे.