अमळनेर : लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर येथे महाविकास आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आयोजित भव्य जनआक्रोश मोर्चात माजी खासदार उन्मेश पाटील यांनी विद्यमान खासदार स्मिता वाघ यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. त्यांनी सभेतच वाघ यांची सोशल मीडियावरील पोस्ट वाचून दाखवत “स्मिताताई, आपण अपघाताने खासदार झालात” असे म्हणत सध्याच्या खासदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, शेतकऱ्यांची कर्जमाफी करून ७/१२ कोरे करावेत आणि खरीप पिकांना पीकविमा मंजूर करावा, या मागण्यांसाठी अमळनेर येथे महाविकास आघाडी तर्फे हा जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता. तालुक्यातील हजारो शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी या मोर्चात सहभाग घेतला.

मोर्चात भाषण करताना उन्मेश पाटील म्हणाले की, “शेतकरी संकटात असताना केंद्र व राज्य सरकारचे प्रतिनिधी फक्त सोशल मीडियावर फोटो पोस्ट करण्यात व्यस्त आहेत. प्रत्यक्षात जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याचे धैर्य त्यांच्यात नाही.” त्यांनी स्मिता वाघ यांच्या फेसबुक पोस्टचा उल्लेख करत, “जनतेच्या समस्या फेसबुक पोस्टने सुटत नाहीत, त्यासाठी जनतेसोबत रस्त्यावर उतरावे लागते,” असेही नमूद केले.
या भाषणादरम्यान उपस्थित शेतकऱ्यांनी “शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे” अशा घोषणा देत मोठ्या उत्साहात प्रतिसाद दिला. मोर्चात महाविकास आघाडीतील विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



