
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील तांबापुर, फुकटपुरा, पंचशील नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर आणि जोहर अरबी मदरसा गल्ली येथे गेल्या अनेक दिवसांपासून स्ट्रीट लाईट बंद आहेत. रात्री या परिसरात रहदारी मोठ्या प्रमाणात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी वारंवार फोनवर तसेच लेखी स्वरूपात महानगरपालिकेच्या लाईट विभागाकडे तक्रार केल्यानंतरही अद्यापही या परिसरातील लाईट सुरु झालेल्या नाहीत, अशी तीव्र नाराजी स्थानिकांमध्ये व्यक्त होत आहे.

ईस्माईल खान कय्युम खान यांनी मंगळवारी (१४ ऑक्टोबर)महापालिकेच्या लाईट विभाग अधिकारी श्री. बोरोले यांना लेखी अर्ज देऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. या अर्जावर मोईनोद्दीन शेख, गौतम सोनू सुरवाडे आणि अहमद खान असलम खान आदी नागरिकांनी सह्या करून परिसरातील अंधारामुळे होणाऱ्या गैरसोयींचे वर्णन केले आहे. रात्री अंधार असल्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण होत असून, परिसरात भटक्या कुत्र्यांचा त्रास आणि काही असामाजिक घटकांची हालचाल वाढल्याने नागरिक अस्वस्थ आहेत.
अंधारामुळे नागरिकांना ओळखीचे चेहरेही नीट दिसत नाहीत, तसेच पादचारी आणि दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका निर्माण होत आहे. काही नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ला करण्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला तातडीने स्ट्रीट लाईट सुरू करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, आधी फोनवर तक्रार दिल्यानंतरही उपाययोजना न झाल्याने आता लेखी अर्जाद्वारे मागणी करावी लागत आहे.
या परिसरात अनेक शाळा, धार्मिक स्थळे आणि निवासी वसाहती असल्याने रात्रीच्या वेळी प्रकाशाची गरज अत्यंत महत्त्वाची आहे. विशेषतः पंचशील नगर आणि मदरसा गल्ली परिसरात गर्दी वाढल्याने महिलांना आणि मुलांना रात्री फिरणे अवघड झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने लाईट दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.
तांबापुर, फुकटपुरा, पंचशील नगर आणि परिसरातील स्ट्रीट लाईट बंद असल्याने नागरिक अंधारात जगत आहेत. कुत्र्यांचा त्रास, अपघातांचा धोका आणि असामाजिक हालचालींमुळे नागरिकांनी महानगरपालिकेकडे तातडीने लाईट सुरू करण्याची मागणी केली आहे.



