Home क्राईम लाचखोरांना दणका : तलाठी, कोतवाल आणि पंटरला रंगेहात पकडले !

लाचखोरांना दणका : तलाठी, कोतवाल आणि पंटरला रंगेहात पकडले !


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वाळू वाहतुकीचे वाहन चालू ठेवण्यास आणि त्याच्यावर कोणतीही कारवाई न करण्याच्या मोबदल्यात ७३ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या तलाठी, कोतवाल आणि एका खाजगी पंटरला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आज भुसावळ तहसील कार्यालयात रंगेहाथ पकडले. या धडाकेबाज कारवाईमुळे संपूर्ण महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

तक्रारदार यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांच्या वाहनावर कारवाई न करण्याच्या ‘मोबदल्यात’ वराड सीमेतील तलाठी नितीन पंडित केले याने तक्रारदार यांच्याकडे ७३ हजार रुपयांची लाच मागितली होती. या लाच मागणीमुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने याबाबत जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार दाखल केली.

तक्रारीची गंभीर दखल घेत एसीबीच्या पथकाने लगेच सापळा रचण्याची तयारी केली. त्यानुसार, सोमवारी (१३ ऑक्टोबर) दुपारी पथकाने पडताळणीसाठी सापळा रचला. भुसावळ तहसील कार्यालयाच्या आवारात तलाठी नितीन पंडित केले याने कोतवाल आणि एका खाजगी पंटरच्या माध्यमातून तक्रारदार यांच्याकडे ७३ हजार रुपयांची मागणी केली. लाच स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असतानाच एसीबीच्या पथकाने तात्काळ कारवाई करत तलाठी नितीन पंडित केले, सोबत असलेला कोतवाल आणि खाजगी पंटर अशा तिन्ही आरोपींना रंगेहाथ पकडले.

या कारवाईमुळे भुसावळ तहसील कार्यालयात एकच धावपळ उडाली. महसूल विभागात लाचखोरीचे प्रकार उघडकीस आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.


Protected Content

Play sound