Home क्रीडा महिला क्रिकेट विश्वचषक 2025 ; भारतासाठी आजचा सामना निर्णायक

महिला क्रिकेट विश्वचषक 2025 ; भारतासाठी आजचा सामना निर्णायक


कोलंबो – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा ।  महिला क्रिकेट विश्वचषक 2025 मध्ये स्पर्धेचा रंग चांगलाच चढला असून इंग्लंड संघाने रविवारी श्रीलंकेवर 89 धावांनी मात करत आपली विजयश्रीची हॅट्रिक पूर्ण केली. या शानदार विजयामुळे इंग्लंडने थेट गुणतालिकेत पहिले स्थान पटकावत स्पर्धेतील समीकरणेच बदलून टाकली आहेत. या विजयाने श्रीलंका संघाचे विश्वचषक स्वप्न जवळपास संपुष्टात आले असून, दुसरीकडे भारताच्या सेमीफायनल आशांवरही दबाव निर्माण झाला आहे.

कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर पार पडलेल्या या लढतीत इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेसमोर 254 धावांचे लक्ष ठेवले. इंग्लंडच्या फलंदाजांनी संयम आणि आक्रमकतेचा सुरेख समतोल साधत श्रीलंकेच्या गोलंदाजांना कोणतीही संधी दिली नाही. प्रत्युत्तरात खेळताना श्रीलंकेचा डाव मात्र पूर्णपणे ढासळला आणि संपूर्ण संघ केवळ 164 धावांत 45.4 षटकांत माघारी परतला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत श्रीलंकेच्या फलंदाजांना एकामागून एक माघारी धाडले.

या विजयामुळे इंग्लंडच्या खात्यात 6 गुण जमा झाले असून तिचा नेट रनरेट +1.864 इतका आहे. त्यामुळे इंग्लंड गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचली आहे. दुसऱ्या स्थानावर असलेली ऑस्ट्रेलिया संघाकडे 5 गुण आहेत, तर तिसऱ्या स्थानावर असलेल्या भारताच्या खात्यात 4 गुण आहेत. भारताने आतापर्यंत तीन सामने खेळून दोन विजय मिळवले असून एक सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.

श्रीलंका संघासाठी मात्र ही स्पर्धा आता अधिक अवघड बनली आहे. सलग तिसऱ्या पराभवाने तिच्या आशांवर पाणी फिरल्याचं चित्र आहे. अद्याप एकही सामना जिंकता न आल्याने श्रीलंकेला अंतिम चारमध्ये पोहोचण्यासाठी चमत्कार घडवावा लागणार आहे.

दरम्यान, भारतासाठी आजचा दिवस निर्णायक ठरणार आहे. 12 ऑक्टोबर रोजी भारताचा चौथा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे. हा सामना जिंकला, तर भारताचे 6 गुण होतील. मात्र, इंग्लंडच्या नेट रनरेटला मागे टाकण्यासाठी भारताला केवळ विजय नव्हे, तर मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. पराभव झाला, तर भारताच्या सेमीफायनलच्या आशा अंधारात जाण्याची शक्यता आहे, आणि उर्वरित सामन्यांमध्ये जबरदस्त संघर्ष पाहायला मिळेल.


Protected Content

Play sound