Home उद्योग सेवानिवृत्त एस.टी. कर्मचाऱ्यांचे १३ रोजी मोर्चाचे आयोजन

सेवानिवृत्त एस.टी. कर्मचाऱ्यांचे १३ रोजी मोर्चाचे आयोजन


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  राज्य परिवहन महामंडळातून (एस.टी.) सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतन, वाढीव पेन्शन आणि इतर लाभांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना, जळगाव शाखेच्यावतीने भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. सोमवार, दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी हा मोर्चा काढण्यात येणार असून जिल्हाधिकारी कार्यालय आणि एस.टी. विभाग नियंत्रक कार्यालय येथे निवेदन देण्यात येणार आहे.

या आंदोलनाची घोषणा पद्मालय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली. संघटनेचे विभागीय सचिव सुरेश चांगले, सचिव योगराज पाटील, विभागीय कार्याध्यक्ष पांडुरंग महाजन आणि विभागीय कोषाध्यक्ष अशोककुमार गाडे यांनी पत्रकारांना संबोधित करत आंदोलनाच्या कारणांवर सविस्तर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धोरणानुसार वाढीव पेन्शन अद्यापही मिळालेली नाही. तसेच अनेक कर्मचाऱ्यांचे वेतन फरक गेल्या काही वर्षांपासून थकलेले आहेत. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलन अपरिहार्य झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संघटनेच्या म्हणण्यानुसार, निवृत्तीनंतर कर्मचार्‍यांनी शांत आयुष्य जगावे अशी अपेक्षा असताना, त्यांना आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे, ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी आहे. शासन आणि एस.टी. प्रशासनाने यावर त्वरीत पावले उचलावीत, अन्यथा हे आंदोलन पुढे अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष विलास कदम, अमृत पाटील, रामभाऊ सोनवणे, सुनील पाटील, भगवान ब्रह्मे, बशीरखान, एस.के. पाटील, दीपक सोनवणे, सुनील बडगुजर, सह-कोषाध्यक्ष दिलीप सूर्यवंशी, सल्लागार अभय सहजी, अरुण साळुंखे, यशवंत फेगडे, विलास पाटील आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संघटनेचे पदाधिकारी म्हणाले की, मोर्चा ही फक्त सुरुवात आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष थांबवला जाणार नाही. या आंदोलनातून सरकारला जाग येईल आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांवर सकारात्मक निर्णय होईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली.


Protected Content

Play sound