
पुणे – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गावी जाणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागातर्फे यंदा दिवाळी विशेष 598 जादा एसटी बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही गाड्या 15 ऑक्टोबरपासून ते 5 नोव्हेंबरदरम्यान उपलब्ध असणार असून, यामुळे पुणेकरांना आणि विशेषतः पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.

दिवाळी अगदी उंबरठ्यावर आली असून, मोठ्या शहरांतून आपापल्या गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नोकरी, शिक्षण, व्यवसाय यासाठी पुणे, मुंबईसारख्या शहरांत स्थायिक झालेल्या लोकांना सणाच्या निमित्ताने आपल्या मुळगावी जायचे असते. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने प्रवाशांची सोय लक्षात घेऊन हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
रेल्वेच्या अनेक गाड्यांचे बुकींग आधीच फुल्ल झाल्यामुळे एसटी हा एकमेव विश्वासार्ह पर्याय प्रवाशांसमोर शिल्लक राहतो. यावर्षी खासगी वाहनधारकांनी प्रवासाचे दर दुप्पट-तिप्पट वाढवले असल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे कंबरडे मोडत होते. त्यामुळे एसटीच्या या अतिरिक्त बसमुळे आर्थिकदृष्ट्या परवडणारा आणि सुरक्षित पर्याय उपलब्ध होणार आहे.
या 598 जादा बसपैकी सर्वाधिक म्हणजेच 396 बस पिंपरी-चिंचवड आगारातून सोडण्यात येणार आहेत. याशिवाय, शिवाजीनगर येथून 80 आणि स्वारगेट बसस्थानकातून 122 बस सुटतील. ही बस सेवा संपूर्ण महाराष्ट्रभर उपलब्ध असेल, त्यामुळे कोकण, विदर्भ, मराठवाडा, खानदेश अशा विविध भागांत जाणाऱ्या प्रवाशांना थेट सेवा मिळणार आहे.
महामंडळाने यंदा पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवड आगारातून विशेष जादा बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. हे ठिकाण पूर्वी बस सेवेसाठी केंद्रबिंदू नव्हते, पण येथून प्रवाशांची वाढती संख्या पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी, पिंपरी-चिंचवड परिसरातील प्रवाशांचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत.
सध्या या सर्व बसचे ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू झाले असून, प्रवासी ST महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा मोबाईल अॅपवरून आपली जागा आरक्षित करू शकतात. यामुळे तिकीटासाठी रांगेत उभं राहण्याची गरज राहिलेली नाही.



