Home क्रीडा अंडर-१७ क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा २०२५चे रोहित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

अंडर-१७ क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा २०२५चे रोहित पवार यांच्या हस्ते उद्घाटन


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । “जीवनात कोणतेही मोठे यश एकट्याच्या बळावर मिळवता येत नाही, संघाच्या मदतीनेच ते शक्य होते. खेळ हीच ती शाळा आहे, जी आपल्याला ही सांघिकता शिकवते,” अशा शब्दांत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमदार रोहित पवार यांनी खेळाडूंना संघभावनेचे महत्त्व सांगत प्रेरणादायी सल्ला दिला.
CISCE (काउंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स) अंडर-१७ क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा २०२५ चा भव्य उद्घाटन सोहळा आज अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी शाळा, जळगाव येथे रोहित पवार यांच्या हस्ते पार पडला.

उद्घाटनप्रसंगी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, M.C.A. अ‍ॅपेक्स कौन्सिलचे सदस्य अतुल जैन, शाळेच्या संचालिका निशा जैन, प्राचार्य देबाशीष दास, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी एस.टी. खैरनार, अरविंद देशपांडे, राजेंद्र लढ्ढा, निवड समितीचे संजय पवार, प्रशिक्षक सुयश बुरकूल आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला प्राचार्य दास यांच्या हस्ते CISCE चा ध्वज फडकावण्यात आला. विद्यार्थ्यांनी ‘चले चलो’ या गीताने स्वागत केले, तर ‘उठा के बल्ला कर दे हल्ला’ या गीतावर सादर केलेल्या समूहनृत्याने वातावरणात जोश भरला.

त्यानंतर सर्व १३ संघांनी मार्चपास करत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. आमदार रोहित पवार यांच्या हस्ते, तायक्वांडो स्पर्धेतील रौप्यपदक विजेती पलक सुराणा हिच्याकडून मशाल घेतली गेली, त्यानंतर अन्मय जैन याने क्रीडा ज्योत प्रज्वलित केली. प्रशिक्षक सुयश बुरकूल यांनी खेळाडूंना खेळातील शिस्त, समर्पण आणि एकजुटीची शपथ दिली.

या स्पर्धेत मध्यप्रदेश, आंध्र-तेलंगणा, कर्नाटक-गोवा, महाराष्ट्र, उत्तराखंड, तामिळनाडू-अंदमान निकोबार, पश्चिम बंगाल, ओडिशा, वेस्ट इंडिया, नॉर्थ इंडिया, बिहार-झारखंड, केरळ आणि दुबई (आंतरराष्ट्रीय) अशा १३ संघांनी सहभाग घेतला असून, एकूण २६० खेळाडू मैदानावर उतरणार आहेत. स्पर्धा चार गटांमध्ये (A, B, C, D) विभागली असून प्रत्येक गटातील अव्वल संघ उपांत्य फेरीत भिडणार आहे.

पहिल्या दिवशीच्या सामन्यात महाराष्ट्र संघाने उत्तराखंडवर ५८ धावांनी विजय मिळवत स्पर्धेला विजयी सुरुवात केली. महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून फलंदाजी करत १५ षटकांत १४५ धावांचा डोंगर उभा केला. उत्तराखंड संघ ८७ धावांमध्ये गारद झाला. महाराष्ट्राच्या आदील लुंगानी याने अवघ्या ११ चेंडूंमध्ये २५ धावांची धडाकेबाज खेळी केली आणि दोन षटकांत केवळ ७ धावा देत एक बळी टिपला. त्यामुळे त्याला सामनावीर घोषित करण्यात आले आणि मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

उद्याचे सामने अनुभूती शाळा (मेहरूण तलावाजवळ) आणि एम.के. स्पोर्ट्स, सावखेडा या दोन ठिकाणी पार पडणार आहेत. पुढील सामन्यांमध्ये गटातील स्थान निश्चित करून उपांत्य फेरी आणि अंतिम लढतीसाठी मैदान सजणार आहे. दरम्यान, खेळाडूंना संबोधित करताना आमदार रोहित पवार यांनी भवरलाल जैन यांच्या कार्याचे स्मरण करून, “संशोधन, समर्पण आणि संघभावना यांच्या आधारे कोणतीही गोष्ट शक्य आहे,” असा विश्वास दिला.


Protected Content

Play sound