जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील विचखेडे गावात गेल्या चार वर्षांपासून रिक्त असलेल्या उपसरपंच पदासाठी अखेर निवडणूक पार पडली असून, सौ. माधुरी भरत माळी यांची या पदावर बिनविरोध निवड करण्यात आली आहे. स्थानिक ग्रामस्थांनी व ग्रामपंचायत सदस्यांनी एकमताने घेतलेल्या या निर्णयामुळे गावाच्या राजकारणात नवा सकारात्मक वळण आल्याचे चित्र आहे.
दि. 23 सप्टेंबर 2025 रोजी विचखेडे ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया पार पडली. या वेळी एकूण आठ ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. सर्व सदस्यांनी एकमताने सौ. माधुरी भरत माळी यांचा उमेदवारी अर्ज मंजूर केला आणि त्यांना बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. विशेष म्हणजे, ही निवडणूक कोणत्याही विरोधाशिवाय व शांततेत पार पडली.

विचखेडे गावातील उपसरपंचपद मागील चार वर्षांपासून राजकीय मतभेदांमुळे रिक्त होते. यापूर्वी 16 सप्टेंबर रोजी निवडणूक घेण्यात आली होती, परंतु त्या दिवशी बैठक अध्यक्षतेखाली घेणारे सरपंच राजकीय कारणास्तव अनुपस्थित राहिल्याने निवडणूक पुढे ढकलण्यात आली. परिणामी ग्रामपंचायत सदस्यांनी गटविकास अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांकडे निवडणूक पुन्हा घेण्याची विनंती केली. या मागणीवर विस्तार अधिकाऱ्यांनी कार्यवाही करत ग्रामसेवकांना 23 सप्टेंबर रोजी निवडणूक घेण्याचे आदेश दिले.
त्यानुसार, निश्चित दिवशी निवडणूक प्रक्रिया पार पडली आणि सौ. माधुरी माळी यांची बिनविरोध निवड झाली. निवडणुकीवेळी ग्रामपंचायत सदस्यांसोबतच गावातील अनेक मान्यवर नागरिक व माजी सरपंच अशोक महाजन, अमोल पाटील आदींचे सहकार्य लाभले. या वेळी माजी उपसरपंच शंकर चौधरी, ओंकार भिल, पंडित पवार, जितेंद्र पाटील, उदय पाटील, आसाराम गायकवाड, भैया गायकवाड, नाना महाजन, भरत पाटील, बबलू कोळी, नाना शिंपी, प्रकाश चौधरी, आबा चौधरी, किरण माळी, पिंटू ठेकेदार, आबा महाजन, विकी पाटील, प्रमोद गायकवाड, रविंद्र कोळी, भजन गायकवाड आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया सचिव म्हणून ग्रामसेवक शेखर पाटील यांनी पार पाडली.
या निवडीनंतर गावातील ग्रामस्थांत समाधानाचे वातावरण आहे. चार वर्षांपासून उपसरपंच पद रिक्त असल्याने प्रशासनात अनेक अडचणी निर्माण होत होत्या. सौ. माधुरी माळी यांची निवड झाल्याने आता विकास कामांना गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



