
जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महानगरपालिकास्तरावरील आंतरशालेय खो-खो स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलने पुन्हा एकदा आपली क्षमता सिद्ध करत सलग तिसऱ्यांदा विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. जिल्हा क्रीडा संकुलावर २१ ते २२ सप्टेंबर दरम्यान पार पडलेल्या या स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या गटात या शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याने आणि एकजुटीने स्पर्धेचे आकर्षण ठरवत विजेतेपद पटकावले.

या स्पर्धेत महापालिकेच्या विविध शाळांनी सहभाग घेतला होता. मात्र, अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सलग तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवून एक अनोखा विक्रम रचला आहे. या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून, संपूर्ण संस्थेसाठी हा गौरवाचा क्षण ठरला आहे.
स्पर्धेपूर्वीच्या तयारीपासूनच विद्यार्थ्यांना योग्य दिशा आणि प्रेरणा देण्याचे काम क्रीडा शिक्षिका श्वेता कोळी आणि प्रशिक्षक आकाश धनगर यांनी नेटाने पार पाडले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी तंत्रशुद्ध खेळ सादर केला आणि खेळातील प्रत्येक क्षणावर प्रभुत्व गाजवत अंतिम विजेतेपद मिळवले.
या यशानंतर शाळेचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन, मुख्याध्यापिका रश्मी लाहोटी यांनी विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच मनोज दाडकर, रूपाली वाघ आणि शिक्षकवृंद यांनीही विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करत, खेळ आणि अभ्यास यामधील समतोल जपल्याबद्दल गौरवोद्गार काढले.
विद्यार्थ्यांच्या यशात व्यवस्थापनाच्या सातत्यपूर्ण पाठिंब्याची महत्त्वपूर्ण भूमिका असून, खेळासाठी आवश्यक सुविधा व प्रोत्साहन वेळोवेळी देण्यात आले, हे यश त्याचाच परिपाक असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. आजच्या स्पर्धात्मक युगात खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणारा आत्मविश्वास, शिस्त व संघभावना ही त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरते, याची प्रचिती या विजयातून पुन्हा एकदा मिळाली आहे.



