Home Cities अमळनेर शारदीय व्याख्यानमाला अमळनेरमध्ये २२ सप्टेंबरपासून 

शारदीय व्याख्यानमाला अमळनेरमध्ये २२ सप्टेंबरपासून 

0
169


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरात सांस्कृतिक व वैचारिक चैतन्य पसरवणारी शारदीय व्याख्यानमाला यंदाही मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आली आहे. मराठी वाङ्‌मय मंडळ, प्रा. आप्पासाहेब र.का. केले सार्वजनिक ग्रंथालय आणि मोफत वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने २२ ते २६ सप्टेंबर दरम्यान ही व्याख्यानमाला मराठा मंगल कार्यालय, अमळनेर येथे रोज संध्याकाळी ६.३० वाजता होणार आहे.

या व्याख्यानमालेचे उद्घाटन मा.अनिल भाईदास पाटील, आमदार यांच्या हस्ते होणार असून, मा.स्मिता उदय वाघ, खासदार, जळगाव यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या पाच दिवसीय कार्यक्रमात संगीत, कविता, समाजसेवा, पालकत्व व कला क्षेत्रातील सामाजिक प्रभाव यावर नामवंत वक्ते आपले विचार मांडणार आहेत.

पहिल्या दिवशी, २२ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार, मुंबई हे “एका संगीतकाराची मुसाफिरी – किस्से, गाणी आणि अनुभव” या विषयावर रसिकांशी संवाद साधतील. संगीतातील त्यांच्या प्रवासातील आठवणी आणि अनुभव यांची गुंफण रसिकांना नव्या दृष्टिकोनातून विचार करायला लावेल.

दुसऱ्या दिवशी, २३ सप्टेंबर रोजी सुप्रसिद्ध मराठी कवी अशोक बागवे व अरुण म्हात्रे (ठाणे) यांची “काव्यसंध्या” रसिकांसाठी खुली होणार आहे. सुमधुर मराठी कवितांचा हा कार्यक्रम श्रोत्यांच्या भावविश्वाला स्पर्शून जाईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

तिसऱ्या दिवशी, २४ सप्टेंबर रोजी समाजसेविका मा. ममता सिंधुताई सपकाळ व सुप्रसिद्ध गझलकार यांनी “हा खरा जीवन प्रवास” या विषयावर आपली जीवनकहाणी, अनुभव व संघर्ष मांडणार आहेत. त्यांची मांडणी समाजमनाला नवी दिशा देणारी ठरेल, असे बोलले जात आहे.

चौथ्या दिवशी, २५ सप्टेंबर रोजी इंजिनिअर सुधीर वाघुळदे व डॉ. राहुल भोईटे (जळगाव) हे “आनंदी पालकत्व – एक सकारात्मक दृष्टिकोन” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. आजच्या बदलत्या पालकत्वाच्या संकल्पनांमध्ये या सत्रामुळे सकारात्मकता वाढेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

शेवटच्या दिवशी, २६ सप्टेंबर रोजी सुप्रसिद्ध सिनेअभिनेता, लेखक व दिग्दर्शक योगेश सोमण (मुंबई) “कला क्षेत्राचा समाज मनावर होणारा प्रभाव” या विषयावर भाष्य करणार आहेत. अभिनय, साहित्य आणि दिग्दर्शन या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी मिळवलेला अनुभव श्रोत्यांना विचारप्रवृत्त करणारा ठरेल.

या व्याख्यानमालेस मराठी वाङ्‌मय मंडळ, अमळनेर आणि ग्रंथालय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, कार्यवाह नरेंद्र निकुंभ, कोषाध्यक्ष प्रदीप साळवी यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग आहे.


Protected Content

Play sound