Home क्राईम निंभोरासिम-विटवा मार्गावर अवैध वाळू तस्करीचा सुळसुळाट; महसूल यंत्रणेचे दुर्लक्ष?

निंभोरासिम-विटवा मार्गावर अवैध वाळू तस्करीचा सुळसुळाट; महसूल यंत्रणेचे दुर्लक्ष?

0
142

रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  रावेर तालुक्यातील निंभोरासिम-विटवा मार्गावरील बरर्डी परिसरात अवैध वाळू वाहतुकीने अक्षरशः उधाण आले असून, रात्रीच्या वेळी डंपरच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात ही वाहतूक सुरू आहे. पर्यावरणाचा गंभीर ऱ्हास होण्याच्या मार्गावर असूनही, ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष व निष्क्रियता यावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

बरर्डी परिसरातील नदीपात्रात अद्याप पाण्याचे अस्तित्व असल्याने वाळू तस्करांनी आपला मोर्चा या दिशेने वळवला आहे. याठिकाणी वाळूचे बिनधास्त उत्खनन सुरू असून, यामध्ये स्थानिक महसूल यंत्रणांची भूमिका संशयास्पद वाटत आहे. तहसीलदार बंडू कापसे व निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांनी यापूर्वी वाळू तस्करीविरोधात ठाम भूमिका घेतली असली, तरी प्रत्यक्ष फिल्डवर कार्यरत असलेल्या ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकाऱ्यांकडून कारवाईची अभाव जाणवतो आहे.

नागरिकांनी सांगितलेल्या माहितीनुसार, बरर्डी परिसरातून रात्रीच्या अंधारात डंपरने वाळूची वाहतूक सातत्याने केली जात आहे. मागील महिन्यात महिला महसूल अधिकाऱ्यांनी मुंजलवाडी येथे कारवाई करत दोन ट्रॅक्टर जप्त करून उदाहरण सादर केले होते. मात्र निंभोरासिम-विटवा मार्गावरील अवैध वाहतुकीकडे प्रशासनाचे डोळेझाक सुरुच असल्याचे चित्र आहे.

रावेर तालुक्यातील वाळू तस्करीप्रकरणी आतापर्यंत सर्वाधिक कारवाया तहसीलदार बंडू कापसे यांनी केल्या असून, त्यांच्याकडे आलेल्या ट्रॅक्टर व डंपर चालकांना त्यांनी कोणत्याही प्रकारची सूट दिली नाही. सर्व प्रकरणांमध्ये दंड वसूल केला गेला आहे. त्यामुळे नागरिकांमध्येही विश्वास निर्माण झाला आहे की, तालुकास्तरावरील वरिष्ठ अधिकारी ठोस भूमिका घेत आहेत. मात्र, स्थानिक अधिकाऱ्यांनीही तेवढ्याच ताकदीने काम करावे, अशी जोरदार मागणी आता होत आहे.

अवैध वाळू वाहतुकीमुळे पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास आणि महसूल विभागाच्या निष्क्रियतेमुळे निर्माण होणारा अन्याय रोखण्यासाठी तातडीने ठोस कारवाई होणे अत्यावश्यक आहे. अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ महसूल यंत्रणेवर येऊ शकते.


Protected Content

Play sound