Home उद्योग जागतिक हवामान बदलाचा परिणाम : केळीच्या उत्पादनावर संकट, किंमती वाढणार

जागतिक हवामान बदलाचा परिणाम : केळीच्या उत्पादनावर संकट, किंमती वाढणार


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जगभरातील सर्वाधिक खाल्ल्या जाणाऱ्या फळांपैकी एक असलेले केळ हवामान बदलाच्या संकटामुळे धोक्यात आले आहे. स्वस्त व पौष्टिक म्हणून ग्राहकांमध्ये लोकप्रिय असलेले केळ जागतिक स्तरावर कमी होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. वाढते तापमान, आर्द्रता आणि बदलती हवामानशैली यामुळे केळी पिकांवर रोगांचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

फ्रेश डेल मॉन्टे या बहुराष्ट्रीय कृषी कंपनीचे चेअरमन मोहम्मद अबू-घझालेह यांनी सांगितले की, “हे संकट अचानक आलेले नाही, तर अनेक वर्षांपासून सुरू आहे.”

सध्या ब्लॅक सिगाटोका आणि ट्रॉपिकल रेस-४ हे दोन घातक रोग कोलंबिया, पेरू यांसारख्या प्रमुख उत्पादन क्षेत्रांमध्ये पसरले असून पुढील काही दशकांत उत्पादन आणि पुरवठा यावर मोठा परिणाम होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

जगभरात केळी उद्योगात सुमारे १० लाखांहून अधिक लोक काम करतात. मात्र, हवामान बदलामुळे हा उद्योग गंभीर अडचणीत येऊ शकतो. नेचर फूड या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन प्रदेशातील उत्पादनासाठी योग्य क्षेत्रे ६० टक्क्यांपर्यंत घटू शकतात. हे दोन्ही प्रदेश सध्या जगातील ८०% केळी निर्यात करतात.

केळी हा जगातील चौथा महत्त्वाचा अन्न पिक असून ४० कोटींहून अधिक लोक आपल्या दैनंदिन उर्जेच्या १५ ते २७ टक्के गरजा केळावर अवलंबून भागवतात. मात्र, केवळ केळ नव्हे तर मका, सोयाबीन, तांदूळ आणि गहू यांसारखी पिकेसुद्धा वाढत्या तापमानामुळे धोक्यात येऊ शकतात.

अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉइसचे प्राध्यापक अँड्र्यू हुल्टग्रेन यांनी सांगितले की, “काही दिवस तापमान अत्यंत जास्त झाल्यास पिकांच्या उत्पादनात मोठी घट होऊ शकते. हवामान बदल थांबवण्यासाठी जीवाश्म इंधनाचा वापर कमी करणे हे सर्वात परिणामकारक पाऊल आहे.”

जागतिक बाजारपेठेत उत्पादन घटल्याने दरवाढ होणार असून याचा परिणाम महागाईसारखा ग्राहकांवर होईल. अमेरिकेत यंदा मे महिन्यात केळीच्या किमती ३.३% ने वाढल्या आहेत.

तरीही ग्राहकांसाठी एक दिलासा म्हणजे, वाढत्या किमती असूनही केळ हे अजूनही बाजारात उपलब्ध असलेले सर्वात स्वस्त फळ राहणार असल्याचा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

“पुढील दशकभर तरी केळ हे सर्वात स्वस्त फळ राहील. ग्राहकांना हे पौष्टिक फळ सहज उपलब्ध राहणार,” असे अबू-घझालेह यांनी नमूद केले.


Protected Content

Play sound