यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल आणि रावेर तालुक्यातील नागरिकांना ‘मोतीबिंदूमुक्त’ करण्याचा संकल्प आमदार अमोल जावळे यांनी प्रत्यक्षात आणण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या पुढाकारातून रविवारी २५ ज्येष्ठ नागरिकांवर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या नेत्रशल्यचिकित्सा विभागात यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार पडल्या.
या सर्व शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आल्या असून, शस्त्रक्रियेनंतर सर्व रुग्णांना आवश्यक उपचार देऊन घरी सोडण्यात आले. विशेष म्हणजे, घरी जाण्यासाठी रुग्णांना रुग्णवाहिकेची मोफत सोय उपलब्ध करून देण्यात आल्याने ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले. या लोककल्याणकारी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील मोलाचे योगदान:
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रवीण पाटील, डॉ. दिव्या सोनवणे, डॉ. शोबिया अन्सारी, डॉ. वृंदा कुंभारे, डॉ. भारती वाणी, डॉ. मयुरेश डोंगरे आणि डॉ. स्वाती असोले यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या कौशल्यामुळेच या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या.
समाजसेवेतील कार्यकर्त्यांची मदत:
या कार्यक्रमाच्या नियोजनापासून ते अंमलबजावणीपर्यंत अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यात शिवम हॉस्पिटलचे संचालक डॉ. पंकज पाटील, दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख, मंत्री गिरीश महाजन वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे आरोग्यदूत पै. शिवाजी रामदास पाटील, होनाजी चव्हाण, चैतन्य कोल्हे आणि तुषार घुगे पाटील यांचा मोलाचा सहभाग होता.
आमदार अमोल जावळे यांनी यावेळी सांगितले की, “अनेक गरीब आणि दुर्बल कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक अडचणींमुळे योग्य नेत्रोपचार मिळत नाहीत. या शस्त्रक्रियेमुळे त्यांना पुन्हा दृष्टी प्राप्त झाली आहे, हे खूप समाधान देणारे कार्य आहे.” ‘मोतीबिंदूमुक्त यावल-रावेर तालुका’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अशा शिबिरांचे आयोजन पुढेही सातत्याने केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. आ. जावळे यांच्या या विधायक पुढाकारामुळे अनेक गरजू नागरिकांना नवे आयुष्य मिळाले आहे.



