Home Cities जळगाव ‘समन्वयाने काम करा, योजनांची गती वाढवा’ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

‘समन्वयाने काम करा, योजनांची गती वाढवा’ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

0
194


धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या उपस्थितीत पंचायत समितीची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत शासनाच्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी समन्वयाने काम करण्याचे आणि योजनांना गती देण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

बैठकीत बोलताना पालकमंत्री पाटील यांनी सरपंच आणि ग्रामसेवकांना जास्तीत जास्त शेत-पानंद रस्त्यांचे परिपूर्ण प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी पाठवण्यास सांगितले. ग्राम रोजगार सेवकांनी आत्मीयतेने काम करून गावोगावी शासनाच्या योजना पोहोचवाव्यात, असे निर्देश त्यांनी दिले. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवणे ही सेवा समजून काम करावे आणि वर्क ऑर्डर मिळालेली कामे दर्जेदार व मुदतीत पूर्ण करावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी विविध विभागांच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. शासनाच्या योजनांमध्ये कोणताही अनावश्यक विलंब होऊ न देता मंजूर प्रकल्प वेळेत पूर्ण करून नागरिकांचा विश्वास जिंकावा, असे निर्देश त्यांनी दिले.

या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, मोदी आवास योजना, शबरी आवास योजना तसेच जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना आणि पंचायत समितीच्या अखत्यारीतील सर्व विभागांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, डी.आर.डी.ए.चे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, गटविकास अधिकारी तुषार वानखेडे, पा.पु. व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन पानझडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय महाजन, गटशिक्षणाधिकारी भावना भोसले, शेतकी संघ अध्यक्ष गजानन बापू पाटील, संजय महाजन, डी.ओ. पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, पी.एम. पाटील, रवींद्र चव्हाण यांच्यासह तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य आणि विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीदरम्यान, पाळधी खुर्द ग्रामपंचायतला मिळालेल्या आयएसओ दर्ज्याबद्दल पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करून गौरवण्यात आले. बैठकीचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी कैलास पाटील यांनी केले, तर प्रास्ताविक गटविकास अधिकारी तुषार वानखेडे यांनी केले आणि विस्तार अधिकारी राजेश इंगळे यांनी आभार प्रदर्शन केले.


Protected Content

Play sound