Home Uncategorized ध.ना. महाविद्यालयातर्फे ‘वृक्षाबंधन’: रोपांना राख्या बांधून दिला पर्यावरणाचा संदेश!

ध.ना. महाविद्यालयातर्फे ‘वृक्षाबंधन’: रोपांना राख्या बांधून दिला पर्यावरणाचा संदेश!


सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाने यंदा अनोख्या पद्धतीने ‘वृक्षाबंधन’ उत्सव साजरा केला. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ या उक्तीनुसार, भावा-बहिणीच्या पवित्र सण रक्षाबंधनाचा औचित्य साधून, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी महाविद्यालयाच्या मियावाकी घनवन प्रकल्पात लागवड केलेल्या रोपांना विद्यार्थिनींनी राख्या बांधून त्यांच्या संवर्धनाचे आणि जतनाचे प्रण घेतले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. मनोहर सुरवाडे यांनी भूषवले. यावेळी उपप्राचार्य प्रा. डॉ. कल्पना पाटील, उपप्राचार्य प्रा. डॉ. हरीश नेमाडे, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. जयश्री पाटील, प्रा. सरला तडवी, प्रा. शिवाजी मगर यांच्यासह महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सहभागी विद्यार्थिनींनी केवळ रोपांना राख्या बांधूनच नाही, तर महाविद्यालय परिसर, घराच्या आजूबाजूला आणि मोकळ्या जागेवर वृक्ष लागवड करून पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वतः पार पाडण्यासोबतच, याबद्दल जनजागृती करण्याची ग्वाही दिली. पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. जयश्री पाटील यांनी केले, तर प्रा. डॉ. सरला तडवी यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिवाजी मगर यांनी केले.

या उपक्रमाचे तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष शिरीष चौधरी यांच्यासह सर्व व्यवस्थापन मंडळ पदाधिकारी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे यांनी कौतुक केले. त्यांनी ‘असाच आदर्श इतरांनी घ्यावा’, अशी आशा व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वनस्पतीशास्त्र विभागातील प्राध्यापक मंदार बामनोदकर, हेमलता पाटील, अदिती ढाके, मोहिनी तायडे, तसेच संतोष तायडे, आर. आर. जोगी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. हा अभिनव उपक्रम पर्यावरणाप्रती जागरूकता वाढवण्यासाठी एक आदर्श उदाहरण ठरला आहे.


Protected Content

Play sound