जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शासकीय आयुर्वेद व होमिओपॅथिक महाविद्यालयावर आणि रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने (ठेकेदारी) काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी आज रुग्णालयासमोर गांधीगिरी मार्गाने ठिय्या आंदोलन केले.
ठेकेदारांकडून केवळ आश्वासने दिली जात असून, ते वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. “वेळेवर पगार होत नसल्यामुळे आमची आणि आमच्या कुटुंबाची उपासमार होत आहे,” अशी व्यथा त्यांनी मांडली. या संदर्भात कर्मचाऱ्यांनी यापूर्वी जिल्हाधिकारी आणि कामगार आयुक्तांना निवेदन दिले होते, मात्र अद्यापपर्यंत या निवेदनावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

कर्मचाऱ्यांनी इशारा दिला आहे की, जर त्यांचे थकीत वेतन लवकरच अदा केले नाही, तर ते आपल्या परिवारासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करतील. वेतन न मिळाल्याने दैनंदिन गरजा भागवणे कठीण झाले असून, कुटुंबांचे भवितव्य टांगणीला लागल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन कर्मचाऱ्यांचे वेतन तात्काळ अदा करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.



