Home राजकीय महाराष्ट्रातील मतदार यादी घोटाळ्यावर राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर थेट सवाल

महाराष्ट्रातील मतदार यादी घोटाळ्यावर राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर थेट सवाल

0
216


नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा ।   देशातील निवडणूक प्रक्रियेवर विश्वास डळमळीत करणारे आरोप काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केले आहेत. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्रासह इतर राज्यांतील निवडणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा ठोस दावा करत थेट आकडेवारी, छायाचित्रं आणि यादींसह पुरावे सादर केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात आणि देशपातळीवर मोठी राजकीय खळबळ उडाली आहे.

राहुल गांधी यांनी या पत्रकार परिषदेत एकामागून एक पाच खळबळजनक दावे करत निवडणूक आयोगावर थेट संशय व्यक्त केला. पहिला आरोप करताना त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात अवघ्या पाच महिन्यांत मतदारसंख्येत इतकी वाढ झाली की ती पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. अशा अनैसर्गिक वाढीमुळे निवडणुकीतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दुसऱ्या आरोपात राहुल गांधी यांनी विधानसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडीचा पराभव आणि लोकसभा निवडणुकीतील विजय यामध्ये स्पष्ट विसंगती दर्शवत सांगितले की, या दोन्ही निवडणुकांदरम्यान तब्बल एक कोटी नवीन मतदारांची नोंद झाली आहे. ही आकडेवारी निवडणूक प्रक्रियेतील मोठ्या तफावतीकडे निर्देश करते, असा त्यांचा दावा आहे.

तिसऱ्या आरोपाद्वारे त्यांनी निवडणूक आयोगाच्या उत्तरादानावर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी सांगितले की, काँग्रेसकडून या प्रकारांबाबत आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र, आयोगाने त्यावर कोणताही ठोस प्रतिसाद दिला नाही. तसेच काँग्रेसने मागितलेला डिजिटल डेटा देखील आयोगाने देण्यास नकार दिला, हे देखील त्यांनी अधोरेखित केले.

चौथ्या आरोपात त्यांनी थेट भाजपावर आणि निवडणूक आयोगावर संगनमताचा आरोप करत सांगितले की, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीदरम्यान संध्याकाळी ५:३० नंतर मोठ्या प्रमाणावर मतदान वाढले. काही भागांमध्ये एकाच व्यक्तीने एकाहून अधिक वेळा मतदान केल्याचे पुरावे मिळाले असून, तीच व्यक्ती कर्नाटक, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातही मतदार आहे, असा दावा त्यांनी केला.

पाचव्या आरोपात राहुल गांधी यांनी मतदार यादीतील गंभीर त्रुटींवर लक्ष वेधले. अनेक मतदारांच्या फोटो ओळखण्याजोगे नसून, काहींच्या फोटोंचाच अभाव आहे. याशिवाय नव्या मतदारांसाठी फॉर्म 6 चा मोठ्या प्रमाणावर गैरवापर झाल्याचा आरोप त्यांनी स्पष्टपणे मांडला.

राहुल गांधी यांनी सादर केलेले हे पुरावे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. या आरोपांमुळे निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर जनतेमध्ये विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आधी राहुल गांधींच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते. मात्र, आता पुरावे सादर झाल्यानंतर निवडणूक आयोग आणि भाजपाची पुढील भूमिका काय असेल, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound