


मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । मुंबईतील दादर भागातील प्रसिद्ध कबुतरखान्याला बंद ठेवण्याच्या महापालिकेच्या निर्णयाला अखेर मुंबई उच्च न्यायालयानेही दुजोरा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून सामाजिक, धार्मिक आणि आरोग्य विषयक कारणांमुळे वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या या कबुतरखान्यावर बंदी कायम ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे कबुतरांना दाणापाणी पुन्हा मिळणार की नाही, याबाबत उत्सुकता होती, मात्र आता न्यायालयाने यावर शिक्कामोर्तब केल्याने हा मुद्दा एका नव्या वळणावर पोहोचला आहे.
दादरमधील कबुतरखाना अनेक वर्षांपासून कार्यरत असून, तेथे रोज शेकडो कबुतरांना दाणापाणी दिलं जात होतं. मात्र, परिसरातील नागरिकांच्या तक्रारी आणि सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने हा कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पालिकेच्या या निर्णयावर जैन समाजाने तीव्र विरोध दर्शवत आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर हे प्रकरण थेट मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले.
न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान सर्व बाजूंनी युक्तिवाद करण्यात आला. अखेर कोर्टाने मुंबई महापालिकेच्या भूमिकेला मान्यता देत कबुतरखाना बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला. न्यायालयाने स्पष्टपणे म्हटलं की, “नागरिकांचे आरोग्य आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे.” यासोबतच कोर्टाने आदेशाचा कोणताही अवमान होऊ नये, असा इशाराही संबंधित पक्षांना दिला.
न्यायालयाने हे देखील नमूद केलं की, “जर या आदेशाविरोधात कोणतीही हरकत असेल, तर ती कायदेशीर मार्गाने मांडावी. आमच्या निकालाचा अवमान होणार नाही, याची काळजी घेतली जावी.” त्यामुळे आता धार्मिक भावना आणि सार्वजनिक आरोग्य यामधील समतोल राखण्याचं मोठं आव्हान पुढे उभं राहिलं आहे.



