Home क्रीडा बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राचे चार खेळाडू आघाडीवर

बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राचे चार खेळाडू आघाडीवर

0
206


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगावच्या जैन हिल्स येथील अनुभूती मंडपममध्ये सुरू असलेल्या ३८ व्या राष्ट्रीय अकरा वर्षांखालील बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत तिसऱ्या दिवशी चिमुकल्या बुद्धिबळपटूंनी आपल्या कौशल्याने उपस्थितांची मने जिंकली. महाराष्ट्रासह देशभरातील आणि परदेशातील खेळाडूंच्या सहभागामुळे या स्पर्धेला जागतिक स्वरूप प्राप्त झाले आहे. सकाळ व संध्याकाळच्या सत्रांचे उद्घाटन अनुक्रमे प्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट डॉ. कल्याणी नागूलकर व डॉ. इंद्राणी मिश्रा यांनी केले.

डॉ. नागूलकर यांनी आपल्या मनोगतात बुद्धिबळाच्या खेळातील मानसिक ताकदीबरोबर शारीरिक आरोग्याच्या संतुलनाचे महत्त्व पटवून दिले. तर डॉ. इंद्राणी मिश्रा यांनी खेळाडूंशी संवाद साधत म्हणाल्या, की बुद्धिबळ केवळ स्पर्धा नसून ती एक मानसिक क्षमता वाढवणारी जीवनशैली आहे. या दोन्ही सत्रांत मुख्य पंच देवाशीस बरूआ, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सचिव निरंजन गोडबोले आणि जैन इरिगेशनचे अनिल जोशी उपस्थित होते.

मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या अद्विक अग्रवाल आणि अविरत चौहान यांनी आपापले सामने जिंकून पहिल्या दोन पटांवर आपली निर्णायक उपस्थिती नोंदवली. अद्विकने निर्वाण शाहचा, तर अविरतने कविश लिमयेचा पराभव करत आपली विजयी घौडदौड कायम राखली. दिल्लीच्या कॅन्डीडेट मास्टर आरीत शाहने उत्तर प्रदेशच्या प्रत्यूशचा पराभव केला. पाचव्या पटावर वेंकट कार्तिकने पश्चिम बंगालच्या सब्रातो मानीला पराभूत करत खळबळजनक निकाल नोंदवला. चौथ्या फेरीअखेर १० खेळाडू चार गुणांसह आघाडीवर असून १५ खेळाडू साडेतीन गुणांसह अजिंक्यपदाच्या शर्यतीत टिकून आहेत.

मुलींच्या गटात अग्रमानांकित केरळची दिवि बिजेशने तमिळनाडूच्या श्रीनिकाला हरवत आपले स्थान बळकट केले. तमिळनाडूच्या पूजाश्री, त्रिपुराची आराध्या दास, महाराष्ट्राची क्रिशा जैन, तेलंगणाची संहिता, कर्नाटकची नक्षत्रा आणि पश्चिम बंगालची आदित्री बैस्य यांनी देखील आपापल्या सामने जिंकले. अरीनी सिंहने गुजरातकडून खेळत कर्नाटकच्या रिश्विता महाजनला बरोबरीत रोखले. चौथ्या फेरीअखेर दिवि बिजेश, पूजाश्री, आराध्या दास, संहिता या चार गुणांसह आघाडीवर होत्या, तर पंजाब, कर्नाटक, दिल्ली, हरियाणा, झारखंड, केरळ आणि राजस्थानच्या खेळाडूंनी साडेतीन गुणांसह आपली शर्यत जिवंत ठेवली.

या स्पर्धेचे आयोजन जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने, महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने आणि अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी प्रायोजकत्व जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेडने स्वीकारले असून भारतासह संयुक्त अरब अमिरात, अबुधाबी, जर्मनी, मलेशिया येथील भारतीय वंशाचे खेळाडूही सहभागी झाले आहेत. जैन हिल्सच्या निसर्गरम्य वातावरणात ५३८ खेळाडू आपली बुद्धिमत्ता पणाला लावत आहेत. स्पर्धेच्या व्यवस्थापनाबाबत खेळाडू आणि पालकांकडून समाधान व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound