Home Uncategorized यावल महाविद्यालयात साहित्यमय अभिवादनाचा कार्यक्रम

यावल महाविद्यालयात साहित्यमय अभिवादनाचा कार्यक्रम


 यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  जगप्रसिद्ध साहित्यिक गोदानकार मुंशी प्रेमचंद यांच्या जयंतीनिमित्त यावल येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सन्मानपूर्वक अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रेमचंद यांच्या साहित्यातील सामाजिक, आर्थिक आणि मानवी मूल्यांचा विचार या कार्यक्रमात सखोलपणे मांडण्यात आला.

जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संचलित महाविद्यालयातील उर्दू व हिंदी विभागाच्या संयुक्त विद्यमाने प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी हिंदी विभागाच्या प्रा. प्रतिभा रावते यांचे साहित्यमूल्यांवर भाष्य करणारे प्रभावी व्याख्यान झाले.

प्रा. रावते यांनी प्रेमचंद यांच्या ‘गोदान’ या अमर कादंबरीचा विशेष उल्लेख करत ‘कफन’ या कथेतून माणसाच्या संवेदनांचा ऱ्हास कसा घडतो याचे जिवंत चित्र उपस्थितांना उभे करून दाखवले. त्यांनी सांगितले की, प्रेमचंद यांच्या साहित्याने ग्रामीण जीवनाचे वास्तव उलगडून दाखवले असून, सामाजिक आणि आर्थिक वास्तव मांडणाऱ्या त्यांच्या साहित्यामुळे ते आजही अजरामर आहेत.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार यांनी प्रेमचंद यांच्या लेखनात सामान्य माणूस केंद्रस्थानी असल्याचे अधोरेखित केले. त्यांच्या साहित्यात शेतकरी, कामगार, स्त्री, दलित, बहुजन यांचे चित्रण असल्यामुळे ते केवळ साहित्यिक नव्हते, तर समाजसुधारक होते असे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचलन आणि आभारप्रदर्शन उर्दू विभागाचे प्रा. इम्रान खान यांनी शायराना अंदाजात करत प्रभावी तिहेरी भूमिका बजावली. कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. हेमंत भंगाळे, हिंदी विभागप्रमुख डॉ. पी. व्ही. पावरा, मराठी विभागाचे प्रा. रत्नाकर कोळी, भुगोल विभागाचे प्रा. पंकज महाजन, इतर प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मुंशी प्रेमचंद यांच्या साहित्यिक वैभवाचे दर्शन घडले, तसेच सामाजिक भान विकसित करणाऱ्या साहित्याचे महत्त्व अधोरेखित झाले.


Protected Content

Play sound