
पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कजगाव ते चाळीसगाव रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या रेल्वेखाली सापडून एका २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज, २ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेने कजगावसह परिसरात शोककळा पसरली आहे. मृत तरुणाचे नाव दुर्गेश भानुदास महाजन (वय २४ वर्ष, रा. कजगाव, ता. भडगाव) असे आहे.

माहिती मिळताच, पाचोरा लोहमार्ग पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस हवालदार लक्ष्मण पवार हे जय मल्हार रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांच्यासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केला.
दुर्गेश हा गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार भानुदास महाजन यांचा मोठा मुलगा होता. दुर्गेशने डी. फार्मसीचे शिक्षण घेतले होते आणि शिक्षणानंतर तो नाशिक येथे एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता. अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता, त्यामुळे या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दुर्गेशच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. याबाबत पाचोरा लोहमार्ग पोलिस दूरक्षेत्रात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पाचोरा लोहमार्ग पोलिस दूरक्षेत्राचे पो. ह. लक्ष्मण पवार हे करीत आहेत. मयत दुर्गेश महाजन याच्या पश्चात आई, वडील आणि एक लहान भाऊ असा परिवार आहे. अत्यंत मितभाषी आणि कष्टाळू स्वभावाच्या दुर्गेश महाजनच्या अकस्मात मृत्यूने कजगावसह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.



