धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पिंप्री गावाजवळ झालेल्या एका रस्ता अपघातात सात वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मनिषा राहुल पाटील (वय ७ वर्षे, रा. सातरणे, ता. जि. धुळे) असे मयत मुलीचे नाव आहे. या घटनेबाबत बुधवारी ३० जुलै रोजी दुपारी ३ वाजता धरणगाव पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २३ जुलै रोजी सायंकाळी ६.०० वाजण्याच्या सुमारास घडली. मनिषा पाटील हिला पिंप्री गावाजवळ रस्ता अपघातात गंभीर दुखापत झाली होती. तिच्या नातेवाईकांनी तातडीने तिला उपचारासाठी जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले. रात्री ९.०० वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना कळवण्यात आली. सुरुवातीला रामानंद पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर हा अकस्मात मृत्यू धरणगाव पोलीस स्टेशन हद्दीत घडल्याने बुधवारी ३० जुलै रोजी दुपारी ३ वाजता धरणगाव पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास धरणगाव पोलीस स्टेशनचे पोहेकॉ राजू पाटील हे करत आहेत.




