Home क्राईम मद्यधुंद चालकाने भर चौकात ट्रक उभा केल्याने वाहतूक ठप्प !

मद्यधुंद चालकाने भर चौकात ट्रक उभा केल्याने वाहतूक ठप्प !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील इच्छादेवी चौकात सोमवारी (२८ जुलै) संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मद्यसाठा घेऊन जाणाऱ्या एका ट्रकचालकाने भर रस्त्यातच ट्रक उभा केल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली. वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी ट्रकचालकाला बाजूला घेण्यास सांगितले असता, तो मद्यपान केलेल्या अवस्थेत आढळला. या प्रकरणी त्याच्यावर ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह’ची कारवाई करण्यात आली.

विशाल मदन वाघ (रा. जालना) असे या चालकाचे नाव असून, तो नाशिक येथून (एमएच १५, ईजी ६२५३) क्रमांकाच्या ट्रकमधून मद्यसाठा घेऊन खामगावकडे जात होता. मात्र, दारूच्या नशेत त्याने इच्छादेवी चौकात रस्त्यातच ट्रक उभा केला, ज्यामुळे रस्त्यावर वाहतुकीचा मोठा अडथळा निर्माण झाला. वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि ट्रकसह चालकाला वाहतूक शाखेत आणले.

चालकाची तपासणी केली असता तो दारूच्या नशेत असल्याचे स्पष्ट झाले, त्यामुळे त्याच्यावर ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे.

ट्रकमधील मद्यसाठ्याची आवश्यक कागदपत्रे चालकाकडे आढळली असली तरी, या साठ्याची मंगळवारी (२९ जुलै) राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सखोल तपासणी केली जाणार आहे. दारू पिऊन वाहन चालवणे हा गंभीर गुन्हा असून, यामुळे इतरांच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना संदेश मिळाला आहे.


Protected Content

Play sound