
रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील कुंभारखेडा येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरा’दरम्यान एक हृदयस्पर्शी घटना घडली, ज्यामुळे हे शिबिर केवळ नावापुरते नसून, खऱ्या अर्थाने नागरिकांना ‘समाधान’ देणारे ठरल्याचे सिद्ध झाले आहे. या शिबिराला रावेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा. अमोलभाऊ जावळे यांची उपस्थिती होती.

शिबिरात गौरव छोटू भालेराव या दिव्यांग युवकाने आमदार अमोलभाऊ जावळे यांची भेट घेऊन आपल्या अडचणी मांडल्या. गौरवची व्यथा ऐकून आमदार जावळे यांनी विलक्षण तत्परता आणि संवेदनशीलता दाखवली. त्यांनी तात्काळ फैजपूरचे उपविभागीय अधिकारी मा. बबनराव काकडे आणि रावेरचे तहसीलदार मा. बंडू कापसे यांना घटनास्थळी बोलावले.
आमदारांच्या सूचनेनुसार या अधिकाऱ्यांनीही त्वरित कार्यवाही करत गौरवचा निराधार अनुदान योजनेअंतर्गत अर्ज स्वीकारून मंजुरीची प्रक्रिया पूर्ण केली. विशेष म्हणजे, मंजुरी मिळाल्यानंतर स्वतः उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे, तहसीलदार बंडू कापसे, कुंभारखेड्याचे सरपंच भरत बोडे, भाजपा तालुकाध्यक्ष अँड. प्रा. सूर्यकांत देशमुख, कपिल चौधरी व इतर कार्यकर्त्यांनी गौरव भालेराव यांच्या घरी जाऊन मंजुरीचे प्रमाणपत्र सुपूर्द केले.
या तात्काळ आणि संवेदनशील निर्णयामुळे परिसरातील ग्रामस्थ आणि लाभार्थ्यांमध्ये मोठी समाधानाची भावना निर्माण झाली आहे. ‘समाधान शिबिर हे केवळ नावापुरते नसून, ते कृतीतून समाधान देणारे ठरत आहे,’ हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले. ग्रामस्थांनी आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या तत्परतेचे आणि संवेदनशीलतेचे मनःपूर्वक कौतुक करत त्यांचे आभार मानले. प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही दाखवलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. अशा शिबिरांमुळे सामान्य नागरिकांना त्वरित न्याय मिळण्यास मदत होते, हे या घटनेने दाखवून दिले आहे.



