
मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । श्री संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याला अवघे दोन दिवस उरले असतानाही, मुक्ताईनगर शहरात अद्यापही घाणीचे साम्राज्य कायम असल्याने लाखो भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरवर्षी या सोहळ्यात देशभरातून लाखो भाविक मुक्ताईनगरमध्ये येतात, मात्र शहराच्या स्वच्छतेकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचे चित्र आहे.

बोदवड रोड परिसरातील घाणीचे साम्राज्य अद्यापही कायम असून, ठेकेदाराकडून साफसफाईचे काम व्यवस्थित झालेले नाही. पालखी सोहळा येत असल्याने शहरात काही ठिकाणी नावालाच साफसफाईची कामे सुरू झाल्याचे दिसत आहे, परंतु अनेक प्रमुख ठिकाणी आणि रस्त्यांच्या कडेला कचऱ्याचे ढिगारे आणि घाण तशीच आहे. ठेकेदाराला सोहळ्याची माहिती असूनही कामात दिरंगाई होत असल्याचा आरोप शहरवासीय करत आहेत.
या गंभीर स्थितीमुळे भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. स्वच्छतेच्या अभावामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. भाविकांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण मिळावे, अशी अपेक्षा असताना प्रशासनाकडून आणि ठेकेदाराकडून दाखवण्यात येत असलेल्या उदासीनतेमुळे स्थानिक नागरिक आणि येणाऱ्या भाविकांमध्ये तीव्र संताप आहे.
प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष देऊन, उर्वरित दोन दिवसांत शहराची युद्धपातळीवर स्वच्छता करावी, अशी मागणी मुक्ताईनगरमधील नागरिकांनी केली आहे. पालखी सोहळ्याची पवित्रता आणि लाखो भाविकांची सोय लक्षात घेता, प्रशासनाने या समस्येवर त्वरित तोडगा काढणे गरजेचे आहे.



