Home Cities अमळनेर धार ते मालपूर रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य: ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांचे अतोनात हाल

धार ते मालपूर रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य: ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांचे अतोनात हाल

0
217


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील धार ते मालपूर या रस्त्याची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या ग्रामस्थ, वयोवृद्ध नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. पावसामुळे रस्त्यावर चिखल साचल्याने पायी चालणेही मुश्किल झाले आहे, तर दुचाकी घसरण्याच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत.

धारपासून मालपूरपर्यंत शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना अक्षरशः कसरत करावी लागत आहे. चिखलातून वाट काढताना त्यांची कपडे खराब होत आहेत, तर अनेकदा घसरून पडण्याचे प्रकारही घडत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवरही परिणाम होत असल्याची भीती व्यक्त होत आहे. रस्त्याच्या आजूबाजूला सर्वत्र घाण आणि कचऱ्याचे ढिगारे साचले असल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दुर्गंधीमुळे आणि अस्वच्छतेमुळे साथीचे रोग पसरण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

याबाबत ग्रामस्थांनी वारंवार ग्रामपंचायतीकडे तक्रार केली असली तरी, ग्रामपंचायत अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांकडून याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. “ग्रामपंचायतीकडे तक्रार करूनही पदाधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी लक्ष देण्यास तयार नाहीत. साधा मुरुम टाकण्याची देखील तसदी घेत नसल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत,” अशी संतप्त प्रतिक्रिया एका मालपूरच्या ग्रामस्थाने दिली.

स्थानिक प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन धार ते मालपूर रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. विद्यार्थ्यांचे आणि नागरिकांचे आरोग्य व सुरक्षितता लक्षात घेऊन या रस्त्याची तातडीने डागडुजी करणे आवश्यक आहे.


Protected Content

Play sound