रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर मतदारसंघातील विविध शासकीय योजनांचा कार्यान्वयनाचा आढावा घेण्यासाठी आमदार अमोल जावळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत महसूल, महावितरण, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, आदिवासी विकास, नगरपरिषद, ग्रामविकास यांसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत विविध योजनांची सद्यस्थिती, अडचणी व उपाययोजना याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.
महसूल विभागाच्या वतीने संजय गांधी निराधार योजना, घरकुल प्रकल्प, शेती मोजणी आणि रेशन दुकानांचे अद्यतनित तपशील सादर करण्यात आले. नगरपरिषदेच्या कामकाजावर चर्चा करताना स्वच्छता मोहिमांची अंमलबजावणी, पाणी पुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थापनाच्या अडचणी तसेच बचत गट प्रभाग संघ कार्यालयाच्या कार्यक्षमतेबाबत चर्चा झाली.

महावितरण विभागाच्या आढाव्यात सबस्टेशन उभारणी, सौरऊर्जा प्रकल्पांचा प्रगती अहवाल आणि शेतकऱ्यांच्या वीजपुरवठ्याशी संबंधित समस्यांवर भर देण्यात आला. पोलीस विभागाच्या आढाव्यात कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेतला गेला, तसेच अवैध गोतस्करीसारख्या गंभीर विषयांवर अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
चारमाळी परिसरातील आदिवासी वस्तीच्या विकासासाठी सुरू असलेल्या योजनांविषयी प्रांताधिकारी व आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांशी स्वतंत्रपणे चर्चा झाली. सार्वजनिक बांधकाम विभागासोबत मतदारसंघातील मुख्य रस्त्यांची स्थिती, प्रलंबित कामांची कारणे व तांत्रिक अडचणींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
या बैठकीस प्रांताधिकारी बबन काकडे, यावल तहसीलदार मोहनमाला नाजीरकर, रावेर तहसीलदार बंडू कापसे, आदिवासी प्रकल्प अधिकारी अरुण पवार, फैजपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अविनाश गांगुर्डे, सावदा विभागाचे अभियंता गणेश महाजन, यावल गटविकास अधिकारी मंजुषा गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता जहांगीर तडवी, जिल्हा परिषदेचे अभियंता रवींद्र इंगळे तसेच पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे, विशाल जैस्वाल, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे, विशाल पाटील, हरिदास बोचरे यांच्यासह अनेक विभागीय अधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या समारोपाप्रसंगी आमदार अमोलभाऊ जावळे यांनी सर्व विभागांनी एकमेकांशी समन्वय साधून गतिमान पद्धतीने कार्य करावे, तसेच जनतेच्या अडचणी वेळेत सोडवण्याचे निर्देश दिले. विकासकामांमध्ये कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.



