जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान आणि जळगाव जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने बचतगटांच्या महिलांना व्यवसायासाठी बेंडाळे चौकातील गाळे नियम व अटीनुसार वितरित करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या संकल्पनेतून राबवलेल्या या उपक्रमामुळे जिल्ह्यातील बचतगटांच्या महिलांना आर्थिक स्वावलंबनासाठी मोठा आधार मिळाला आहे.
थकबाकी असल्यामुळे जिल्हा परिषदेने बेंडाळे चौकातील जिल्हा परिषदेच्या मालकीचे गाळे प्रशासनाने चार वर्षांपुर्वी जप्त करून सीलबंद केले होते. त्यामुळे हे गाळे तेव्हापासून बंद अवस्थेत होते. दरम्यान, बचतगटांच्या महिलांना आर्थिक हातभार लागावा आणि त्यांना आपला व्यवसाय सुरू करता यावा, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी पुढाकार घेऊन हे बंद असलेले गाळे बचतगटांच्या महिलांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. यामुळे बचतगटांच्या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या उपक्रमामुळे महिलांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत. या गाळ्यांमुळे महिलांना मुख्य रस्त्यावरच आपल्या उत्पादनांची विक्री करण्याची संधी मिळणार असून, त्यांच्या व्यवसायाला चालना मिळण्यास मदत होईल. जिल्हा परिषदेचा हा निर्णय ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणात महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे मत व्यक्त होत आहे.



