जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली असून, केंद्र सरकारच्या वतीने नजीकच्या काळात ही जनगणना होणार आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ यांनी, जातीनिहाय जनगणनेचे महत्त्व तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तीव्र लढा उभारणार असल्याची माहिती दिली. ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात अनेक प्रश्न आहेत आणि वेळोवेळी निघणाऱ्या मुद्द्यांचे निराकरण जातीनिहाय जनगणनेतूनच होणार असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले.
जळगाव येथील पद्मालय शासकीय विश्रामगृह येथे आयोजित जिल्हास्तरीय बैठकीत ते बोलत होते. विदर्भ, मराठवाडा येथील बैठकांनंतर जळगावात ही बैठक घेण्यात आली.

समीर भुजबळ म्हणाले की, भाटिया कमिशनमुळे ओबीसी आरक्षण कमी झाले होते. समता परिषदेच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून ओबीसी आरक्षण राखले असले तरी, आपण संघटित आणि जागृत राहिले पाहिजे. तळागाळातील लोकांपर्यंत जातीनिहाय जनगणनेचे महत्त्व समजावून सांगणे, तसेच जातीनिहाय जनगणनेत सहभागी होणे किती आवश्यक आहे, हे पटवून देणे गरजेचे आहे. सर्व जाती-जमातींच्या नागरिकांनी काळजीपूर्वक आणि जागृतपणे आपल्या नोंदी करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने संघटना मजबूत करण्यासाठी आढावा बैठका घेतल्या जात आहेत. येत्या काळात जातीनिहाय जनगणनेसंदर्भात लोकांना प्रबोधन आणि मार्गदर्शन करण्यासाठी विभागवार बैठकांचे आयोजन करण्यात आल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.
यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक, डॉ. नागेश गवळी, प्रा. संतोष विरकर, अशोक खलाणे, ज्ञानेश्वर महाजन, सतीश महाजन, संतोष माळी, वसंत पाटील, भूषण महाजन, कृष्णा माळी, कैलास महाजन, प्रकाश महाजन, प्रताप महाजन, सौ. निवेदिता ताठे, अभिलाषा रोकडे, सारिका माळी, शालिग्राम मालकर, सारिका शिंपी, पवन माळी, यज्ञेश बाविस्कर, उमेश महाजन, भिला महाजन, पुष्पा महाजन, मोनालिका पवार यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.



