


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । संघ लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) तर्फे प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य योजना राबविण्यात येत आहे. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील तसेच अमृतच्या लक्षित गटातील पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.
या योजनेंतर्गत यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षा आणि मुलाखत पूर्वतयारीसाठी उमेदवारांना आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दि. १७ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन अमृतच्या वतीने करण्यात आले आहे. अमृतच्या लक्षित गटामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी, मारवाडी, पाटील, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, वैश्य, नायर, नायडू, कम्मा, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुंथर, गुजराती, जाट, हिंदू नेपाळी, भूमिहार, लोहारणा, कानबी आदी समाजघटकांचा समावेश करण्यात आला आहे. सन २०२६ मध्ये झालेल्या संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेले आणि या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अमृतच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे कळविण्यात आले आहे.
योजनेअंतर्गत नागरी सेवा मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी पात्र उमेदवारांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. तसेच यूपीएससी मुलाखत फेरीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुलाखत पूर्वतयारीसाठी २५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे. या आर्थिक सहाय्यामुळे आर्थिक अडचणी असलेल्या गुणवंत उमेदवारांना यूपीएससीसारख्या स्पर्धात्मक परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक मदत मिळणार असून त्यांच्या यशाच्या संधींना चालना मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अमृतच्या https://mahaamrut.org.in/ या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा. योजनेशी संबंधित सर्व माहिती, सूचना आणि अद्यतने अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
ऑनलाइन अर्ज भरताना काही अडचण किंवा शंका असल्यास उमेदवारांनी संबंधित जिल्हा अमृत कार्यालयाशी ७३९१०६५४७६ किंवा ८२३७६५७१७८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा अमृत कार्यालयाचे व्यवस्थापक राजेंद्र कानडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली असून, पात्र उमेदवारांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.



