जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । देशाच्या सीमांवर अहोरात्र आपले संरक्षण करणाऱ्या शूर जवानांच्या सन्मानार्थ जळगावमधील नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था आणि रेड स्वस्तिक सोसायटी यांनी रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून एक आगळावेगळा उपक्रम राबवला. संस्थेच्या महिला सदस्यांनी प्रेमाचे आणि आपुलकीचे प्रतीक असलेल्या राख्या तयार करून त्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत सीमेवर तैनात असलेल्या जवानांसाठी पाठवल्या.
या राख्या जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. निलेश पाटील यांच्याकडे औपचारिकरित्या सुपूर्द करण्यात आल्या. या वेळी सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभेदार संजय गायकवाड, नारीशक्ती संस्थेच्या अध्यक्षा व रेड स्वस्तिक महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्ष सौ. मनिषा पाटील, वंदना मंडावरे, आशा मौर्य, किमया पाटील, कांचन पाटील, हर्षा गुजराती, शिल्पा बयास, श्रावणी पाटील, शोभना मकवाना यांसह अनेक महिला सदस्या उपस्थित होत्या.

या उपक्रमाविषयी बोलताना मेजर डॉ. निलेश पाटील यांनी नारीशक्ती संस्थेच्या या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, “या राख्यांमुळे केवळ जवानांना आपुलकीची भावना मिळते असे नाही, तर समाजात देशभक्ती आणि एकजुटीचा सकारात्मक संदेशही पसरतो.” अशा उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये सैनिकांविषयीचा अभिमान अधिक वाढतो आणि सामाजिक एकतेला प्रोत्साहन मिळते, असेही त्यांनी नमूद केले. नारीशक्ती संस्थेने राबवलेल्या या उपक्रमामुळे समाजातील विविध स्तरांवर सैनिकांविषयी आदर आणि कृतज्ञतेची भावना अधिक दृढ होण्यास मदत झाली आहे.



