अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर नगरपरिषदेने कोणत्याही लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीत घेतलेल्या निर्णयांविरोधात शहरातील विविध संघटना, व्यापारी, बांधकाम व्यावसायिक, नागरिक आणि पत्रकार संघटनेने एकत्र येत ठोस भूमिका घेतली आहे. घरपट्टीत मोठ्या प्रमाणावर वाढ व खाजगी संस्थेला दिलेला सर्वेक्षणाचा ठेका हे मुद्दे चर्चेचा केंद्रबिंदू ठरले. या पार्श्वभूमीवर अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाच्या नेतृत्वाखाली श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात पार पडलेल्या सहविचार सभेत एकमुखी ठराव करण्यात आला.
सभेमध्ये नगरपरिषदेत सध्या कौन्सिल अस्तित्वात नसल्याने एकतर्फी पद्धतीने कर वाढीचा निर्णय अन्यायकारक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. या निर्णयाविरोधात आवाज उठवण्यासाठी सर्वपक्षीय प्रतिनिधी, माजी नगरसेवक, बांधकाम व्यावसायिक व सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांना एकाएकी मोठ्या रकमेच्या घरपट्टी बिलांचा फटका बसल्यामुळे असंतोष पसरलेला आहे. त्यातच खाजगी संस्थेला मोबदला देऊन सर्वेक्षणाचा ठेका देणे आणि त्यानुसारच कर आकारणी करणे यावर बहुसंख्यांनी नाराजी व्यक्त केली.

माजी नगरसेवक मुन्ना शर्मा, प्रा. अशोक पवार, सुभाष चौधरी, प्रशांत निकम, श्याम पाटील, संदीप घोरपडे, मनोज पाटील, प्रविण पाठक, पंकज चौधरी आदींनी सभेत विविध मुद्द्यांवर सडेतोड भूमिका मांडली. प्रशासकांनी दिलेल्या 2 कोटींच्या ठेक्यावर सवाल उपस्थित करण्यात आला. मोजणीसाठी प्रशासकांकडे अधिकार नसताना इतका मोठा ठेका देणे म्हणजे सार्वजनिक निधीचा गैरवापर असल्याचा आरोप करण्यात आला.
सभेतील सर्व प्रतिनिधींनी एकत्र येत आमदार अनिल भाईदास पाटील यांना भेट दिली व निवेदन सादर केले. आमदारांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच नगरपरिषदेमध्ये बैठक घेऊन निर्णयावर फेरविचार करावा लागेल, अशी ग्वाही दिली. सभेत ‘कोणीही टॅक्स भरू नये, एकत्र लढा द्या’ असा ठराव करत जनतेच्या भावनांचा जोरदार उद्रेक झाला.
बांधकाम व्यावसायिकांनी तसेच व्यापारी प्रतिनिधींनी लोकवर्गणी, हस्तांतरणावर आकारल्या जाणाऱ्या टक्केवारीबाबतही प्रश्न उपस्थित केले. कराच्या नावाखाली नागरिकांची लूट सुरु असल्याचा थेट आरोप करण्यात आला. अनेकांनी पालिकेच्या टॅक्स धोरणावर टीका करत “आ बैल मुझे मार” पद्धतीने नागरिकांवर कर लादले जात असल्याचे सांगितले.
या सभेमध्ये शहरातील सर्वपक्षीय प्रतिनिधी, सामाजिक संस्था, व्यापारी संघटनांचे पदाधिकारी आणि पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यशस्वी आयोजनासाठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
दरम्यान, आज दिनांक 14 जुलै रोजी सकाळी 11 वाजता नगरपरिषद मुख्याधिकारी आणि खासदार स्मिताताई वाघ यांना निवेदन देण्यात येणार आहे. या वेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.



