Home क्राईम हातभट्टी दारूविरोधात मोठी कारवाई: एकाच दिवशी १३४ गुन्हे दाखल, लाखोंचा ऐवज जप्त

हातभट्टी दारूविरोधात मोठी कारवाई: एकाच दिवशी १३४ गुन्हे दाखल, लाखोंचा ऐवज जप्त


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात अवैध हातभट्टी दारूविरोधात प्रशासनाने “शून्य सहनशीलता धोरणा” अंतर्गत मोठी मोहीम राबवली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशाने आणि पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी तसेच राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक व्ही.टी. भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तपणे धडक कारवाई केली. या एकाच दिवसाच्या धाडसत्रात जिल्ह्यात तब्बल १३४ गुन्हे दाखल करण्यात आले असून, मोठ्या प्रमाणात दारू, कच्चे रसायन आणि एक वाहन जप्त करण्यात आले आहे.

या प्रभावी मोहिमेत एकूण ३ हजार ३८५ लिटर गावठी हातभट्टी दारू, २० हजार १५० लिटर रसायन (कच्चा माल) आणि एक चारचाकी वाहन असा एकूण १४ लाख ४८ हजार ६६२ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात पोलीस विभागाकडून ९९ गुन्हे तर राज्य उत्पादन शुक्ल विभागाकडून ३५ गुन्हे असे एकुण १३४ गुन्हे दाखल करण्यात आले असून यातील कच्चे रसायन नष्ट करण्यात आले आहे.

अवैध दारू निर्मिती आणि विक्रीवर आळा घालण्यासाठी प्रशासनाने उचललेले हे पाऊल जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीला मोठा धक्का देणारे मानले जात आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कुठेही अवैध दारूचे उत्पादन, विक्री किंवा वाहतूक होत असल्यास टोल फ्री क्रमांक १८००-२३३-९९९९ किंवा व्हॉट्सॲप क्रमांक ८४२२००११३३ वर त्वरित माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


Protected Content

Play sound